अहेरी तालुक्यात अतिवृष्टी, पूरग्रस्त नुकसान भरपाई वाटपात गैरव्यवहार

86

– पुनर्सर्व्हेक्षण करण्याची व्येंकटरावपेठा येथील शेतकऱ्यांची राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : यंदाच्या पावसाळ्यात अतीवृष्टीने कहर केला होता. सर्वात जास्त फटका अहेरी तालुक्यातील शेतकर्‍यांना बसला होता. महाराष्ट्र शासनाने परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन मदतनिधी जाहीर केली आणि महसूल विभागाला त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले. परंतु पंचनामा करणार्‍या यंत्रणेने त्यातही मलाई कशी लाटता येईल त्याचे मार्ग तयार केले.
व्येंकटरावपेठा येथील शेतकऱ्यांनी पूूरपीडित तथा अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाई वाटपात फार मोठा घोळ झाल्याची तक्रार माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे एक निवेदन देवून केली. खोटे शेतकरी ऊभे करुन खर्‍या पिडीतांना नुकसान भरपाई मिळण्यापासुन वंचीत ठेवल्याचा प्रकार घडल्याचे सांगितले. ज्यांच्या नावे अजिबात शेती नाही अशांनाही शेतकरी दाखवून भरपाई दिल्या गेली. एकाच सातबार्‍यावर कित्येकांना नुकसान भरपाई दिल्या गेली. काही निरक्षरांच्या नावे भरपाईची रक्कम टाकुन त्यांच्या मार्फत विड्राॅल करवून मोठी रक्कम गिळंकृत करण्यात आली. अशा नाना तक्रारी राजे साहेबांना सांगीतल्या. बँकेचे cctv तपासल्यास सर्व खोटे लाभार्थी ऊघडीस येतील, असे शेतकऱ्यांनी सांगितले व याची योग्य चौकशी करुन गैरव्यवहार करणार्‍यांवर कठोर कारवाही करण्यात यावी तसेच पुनर्सर्व्हेक्षण करुन खर्‍या पिडीत शेतककर्‍यांना मदत मिळवुन द्यावी, अशी मागणी ह्या शेतकऱ्यांनी केली.
अहेरी तालुक्यातील केवळ व्येंकटरावपेठाच नव्हे तर असा प्रकार बोरी, महागाव, वांगेपल्ली, चिंचगुंडी, देवलमरी, आवलमरी इत्यादी ग्रामपंचायती मध्येही असाच मोठ्या प्रमाणात घोळ झाला असल्याचे राजे साहेबांना ह्या शेतकऱ्यांनी सांगितले. पालकमंत्री मा. देवेन्द्रजी फडणवीस ह्यांना सांगुन पिडीतांना योग्य न्याय लवकरच मिळवुन देण्याचे आश्वासन राजे साहेबांनी ह्या शेतकऱ्यांना दिले.