विशेष मोहीम राबविण्यात येणार : जिल्हाधिकारी संजय मीणा

59

– छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दिनांक 01 जानेवारी, 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा वार्षिक विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करणेत आला आहे. या कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक आले आहे. एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा कालावधी हा 09 नोव्हेंबर, 2022 (बुधवार) रोजी पर्यंत असेल. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दिनांक 09 नोव्हेंबर ते दिनांक 08 डिसेंबर, विशेष मोहिमांचा कालावधी हा दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी निश्चीत केलेले दोन शनिवार व रविवार दिनांक 19 व 20 नोव्हेंबर 2022 शनिवार, रविवार दिनांक 3 व 4 डिसेंबर 2022 शनिवार, रविवार. दावे हरकती निकालात काढण्याचा कालावधी दिनांक 26 डिसेंबर,2022 (सोमवार) पर्यंत, तर मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्याचा दिनांक 05 जानेवारी, 2023 (गुरूवार) असा आहे.

आता पर्यंत मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा म्हणजे 1 जानेवारी किंवा त्या आधी 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरीकांना मतदार नोंदणी करता यायची. मात्र 2023 पासून भारत निवडणूक आयोगाने आता चार अर्हता दिनांक अनुक्रमे 01 जानेवारी, 01 एप्रिल, 01 जुलै व 01 ऑक्टोबर किंवा त्या आधी ज्या नागरीकांची 18 वर्षे पुर्ण होतील, त्यांना 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 या विशेष मोहिमे-अंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.

दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय तसेच सर्व मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारुप मतदार यादी प्रकाशीत केलेली आहे. मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदार संघ इ. तपशील मतदार यादित तपासुन ते अचुक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडुन केली जाते. त्यामुळे मतदारांनी प्रारुप मतदार यादितील आपले तपशील आत्ताच तपासणे महत्वाचे आहे. 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 हा कालावधी मतदार नोंदणीचा आहे, तसा तो एखाद्याच्या नावासंबंधी हरकती घेण्याचाही आहे. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार, यादित दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदार संघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळुन आले तर पडताळणी करुन संबंधीत मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्वाची असते.
यंदाच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने 19 व 20 नोव्हेंबर आणि 3 व 4 डिसेंबर या दिवशी जिल्हाभर विशेष शिबीरांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच वंचीत घटकांसाठी खास शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जसे महीला व दिव्यांग, तृतीय पंथीय नागरीक, देह व्यवसाय करण्याऱ्या महिला आणी घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीचे नागरीक.
ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने 10 नोव्हेंबर रोजी जिल्हाभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. या दिवशी जिल्ह्यातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले गेले. त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरीक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरुपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरीक यांची नोंदणी करण्याकरीता नमुना अर्ज – 6 गोळा करण्यात आले आहे. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरुपी स्थलांतरीत झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादितुन वगळनी करीता नमुना अर्ज 7 गोळा करण्यात आलेले आहे.
निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी विशेष पिडब्ल्यु या ॲपची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. वापरण्यास सहज-सुलभ असलेल्या या ॲपच्या सहाय्याने दिव्यांग मतदारांना नाव नोंदणी करता येईल. ज्यांची नाव नोंदणी आधीच झाली आहे, पण दिव्यांग म्हणून नोंद नसेल त्यांना या ॲपवरुन दिव्यांगत्व चिन्हाकित करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. दिव्यांगत्व चिन्हांकित झाल्यानंतर या मतदारांना मतदानाच्या वेळी पोस्टल मतपत्रीका, चाकाची खुर्ची, वाहन, आदी सुविधा पुरविणे निवडणूक कार्यालयासाठी सोईचे ठरते.
मतदार नोंदणीसाठी पात्र युवांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे तसेच प्रत्येक मतदारानं प्रारुप मतदार यादितील आपले तपशील अचुक आहेत का याची खात्री करुन घ्यावी शिवाय मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशीलातील दुरुस्त्या या सुविधा NVSP, Voter Portal या संकेतस्थळावर आणि Voter Helpline या मोबाईल ॲपवर उपलब्ध आहेत. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीणा यांनी केले आहे.