विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : चामोर्शी येथील सांस्कृतिक सभागृह बाजार चौक येथे तालुका खरेदी विक्री सह. मर्या चामोर्शी येथे भागधारक सभासद यांची नावे बेकायदेशीररित्या मतदार यादीतून वगळण्यात आल्याबद्दल व येथील अनेक शेतकऱ्यांचे सभासदत्व चामोर्शी खरेदी विक्री संस्थेतून रद्द केल्याच्या निषेधार्थ गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांच्या उपस्थितीत नगरसेवक आशीषभाऊ पिपरे यांच्या पुढाकाराने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य स्वप्नीलभाऊ वरघंटे, रेवनाथभाऊ कुसराम, ज्येष्ठ नेते माणिक तुरे, त्रीयुगी दुबे महाराज, अशोक धोडरे, विश्वनाथ बुरांडे, वैरागडे उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना खासदार अशोकजी नेते, नगरसेवक आशीषभाऊ पिपरे यांनी मार्गदर्शन केले. या जाहीर सभेत खासदार अशोकजी नेते यांनी चामोर्शी येथील खरेदी विक्री संघात तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायावर नाराजी व्यक्त केली व जोपर्यंत खरेदी विक्री संघाची निवडणूक रद्द होणार नाही तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही व शासन स्तरावर आपण पाठपुरावा करून तालुक्यातील भागधारक शेतकरी, शेतमजूर बांधवांना आपण न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन याप्रसंगी केले व आजपर्यंत खरेदी विक्री संघात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली.
प्रामुख्याने तालुक्यातील बेकायदेशीर रद्द करण्यात आलेल्या सभासदांना सभासदत्व मिळवून देणे, मतदार यादीतून वगळण्यात आलेले पुन्हा समाविष्ट करण्यात यावे, नवीन सभासदांची नावे नोंदणी करणे, मय्यत सभासदांच्या वारसदारांना सभासदत्व मिळवून देणे व अनेक प्रमुख विषयावर खासदार अशोकजी नेते यांनी प्रकाश टाकला व हा अन्याय सहन केल्या जाणार नाही, असा इशारा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक आशीषभाऊ पिपरे, सूत्रसंचालन रमेश अधिकारी यांनी कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील खरेदी विक्री संघातील अन्यायग्रस्त भागधारक शेतकरी, शेतमजूर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात तालुक्यातील विविध गावातील शेकडो शेतकरी, शेतमजूर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी खरेदी विक्री संघात अन्याय झालेल्या भागधारक शेतकरी, शेतमजूर यांनी झालेल्या अन्यायाविरोधात जोरदार नारेबाजी करून जाहीर सभेचा समारोप केला.