अहेरी बेस डेपोत प्राप्त तांदूळ निकृष्ट दर्जाचा : तांदळाच्या लॉट्सची होणार गुणवत्ता तपासणी

69

– जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची गुणनियंत्रक पथकाला तपासणीच्या सूचना

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून तांदूळ वाटप करण्यासाठी स्थानिक राईस मिलर्सना भरडाईकरिता धान देण्यात येते. मात्र उत्कृष्ट धान दिल्यानंतर चांगल्या प्रतीचा तांदूळ शासनाला पुरवठा केल्या जात नसल्याचा प्रकार उजेडात आला असून अहेरी येथील बेस डेपोमध्ये वडसा येथील जेजानी राईस मिलर्सने निकृष्ट दर्जाचा तांदूळ जमा केल्याचे समोर आल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी गडचिरोली यांनी नागपूर येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गुणनियंत्रक पथकाला पत्र पाठवून अहेरीच्या बेस डेपोतील तांदळाची गुणवत्ता तपासणी करण्याची सूचना केली आहे. या प्रकारामुळे निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा करणाऱ्या राईस मिलर्समध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील बेस डेपो अहेरी येथे 30 सप्टेंबर 2022 पर्यंत जेजानी राईस मील वडसा यांना 10 लॉट्स बेस डेपो अहेरी येथे जमा करण्याबाबत जिल्हा पुरवठा कार्यालयाने आदेश दिले होते. सदर 10 लॉट्सची 2 ऑक्टोबर 2022 ला गुणवत्ता तपासणी केली असता सदर तांदूळ हा निकृष्ट व निम्न दर्जाचा असल्याबाबत निदर्शनास आलेले असून हा तांदूळ मानवास खाण्यास योग्य नसल्याचे आढळून आलेले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने पत्रात म्हटले आहे. तसेच जेजानी राईस मील वडसा यांची देसाईगंज येथील सामाजिक कार्यकर्ते धर्मदेव रॉय यांनी तक्रार केली असता त्यावर योग्य ती कार्यवाही होण्याच्या अनुषंगाने जेजानी राईस मील वडसा यांच्या बेस डेपो अहेरी येथील 10 लॉट्सची योग्य ती गुणवत्ता तपासणी करून त्याबाबतचा अहवाल कार्यालयास सादर करण्याची सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी गडचिरोली यांनी गुणनियंत्रक पथकाला दिल्या आहेत. त्यामुळे शासनाला निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा करणाऱ्या मिलर्सचे धाबे दणाणले आहेत.