– जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांकरिता जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत केली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांवर पालकमंत्री महोदय यांचे लक्षही वेधले
बैठकीला खासदार अशोकजी नेते, आरमोरीचे आमदार कृष्णाजी गजबे, अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, विधान परिषदेचे आमदार अभिजीतजी वंजारी, भाजपा जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे, जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, नागपूर विभागाचे पोलिस संचालक संदीपजी पाटील, जिल्हाधिकारी संजयजी मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अंकितजी गोयल यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी देवेंद्रजींचे जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत लक्ष वेधले गडचिरोली जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून गैरआदिवासी समाजाला जमिनीचे पट्टे मिळालेले नाही. त्यामुळे ते अजूनही अतिक्रमण धारक म्हणून गणले जातात. परिणामी ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अतिक्रमणधारक म्हणून त्यांना अपात्र केले जाते. त्यामुळे त्यांच्या जमिनीचे पट्ट्यासाठी असणारी ३ पिढ्याची जाचक अट रद्द करावी अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
अतिवृष्टीमुळे व भंडारा जिल्ह्यात असणाऱ्या गोसेखुर्द धरणामुळे जिल्ह्यात ३ वेळा महापुराची परिस्थिती निर्माण झाली परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळालेला नाही. त्यातच अतिवृष्टीच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांना या मदतीपासून वगळण्यात आले. ९ जिल्ह्यांमध्ये घोषित केल्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत जाहीर करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
चामोर्शी तालुक्यातील २४ गावातील शेतकऱ्यांना लोड शेडिंग मुळे शेतीला पाणीपुरवठा थांबलेला आहे. किमान धान्याची फसल अंतिम टप्प्यात असल्याने या ठिकाणी लोड शेडींग थांबवण्यात यावा, अशी मागणी केली. चामोर्शी येथील बसस्थानक करिता तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची ही मागणी त्यांनी यावेळी केली.
मागील काही दिवसांपासून वाघाने अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतलेला असल्याने वाघाचा बंदोबस्त करावाच ,परंतु शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी शेतीला तारेचे कंपावन डीपीसी अंतर्गत मंजूर करावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.