पुढील ५० वर्षे भाजपाला हरविणे अशक्य : आमदार डॉ. देवरावजी होळी

34

– राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या सेवा पंधरवड्यानिमित्त गडचिरोली येथे बुद्धिजीवी संमेलन, चर्चासत्र व मोदीजींच्या जीवनावरील चित्र प्रदर्शनीचे आयोजन

– मोदीजींनी केलेल्या कार्याची माहिती व त्याचा जनतेला लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करण्याची आवश्यकता

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारताचे यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान राष्ट्रनेता माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलेल्या राष्ट्रहिताच्या मार्गावर, जनतेच्या कल्याणासाठी काम करीत चालल्यास पुढील ५० वर्षे भारतीय जनता पार्टीला कोणी हरवू शकणार नाही, असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या सेवा पंधरवड्यानिमित्त गडचिरोली येथे आयोजित बुद्धिजीवी संमेलन, चर्चासत्र व मोदीजींच्या जीवनावरील चित्र प्रदर्शनीच्या कार्यक्रमाप्रसंगी केले.

भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या १७ सप्टेंबर या जन्मदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबर या जयंतीपर्यंत “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मंचावर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते, भाजपा जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, भाजपा जिल्हा महामंत्री रवींद्रजी ओल्लालवार, गोविंदजी सारडा, प्रशांतजी वाघरे, प्रमोदजी पिपरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. योगिताताई भांडेकर, माजी नगर परिषद अध्यक्षा सौ. योगिताताई पिपरे, भाजपा ज्येष्ठ नेते तथा किसान आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य रमेशजी भुरसे, किसान आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रा. रमेशजी बारसागडे, महिला आघाडीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य रेखाताई डोळस, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे, गडचिरोली भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष बबलूभाई हुसैनी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले की, पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी जनकल्याणासाठी अनेक योजना सुरू केल्या. त्या योजना यशस्वीपणे राबवल्या. सर्व जनतेला सर्वसामान्य नागरिकाला त्यांनी सुरू केलेल्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळू लागलेला आहे. संपूर्ण जगामध्ये देशाची मान उंचावलेली आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये देश प्रगतीपथावर जात आहे. कर्ज घेणारा देश कर्ज देऊ लागलेला आहे. भ्रष्टाचाऱ्यांवर वचक बसवलेला आहे. निवडणुकीत केलेल्या आश्वासनांची पूर्ती केली आहे.
त्यांनी सांगितलेले “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” हे सूत्र यशस्वी ठरले असून या सूत्रानुसार आपण देशहितासाठी, सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी काम केल्यास पुढील ५० वर्ष भारतीय जनता पार्टीला कोणीही हरवू शकणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी उपस्थित शेतकरी लाभार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात काम केलेल्या बुद्धिजीविंचा सत्कारही करण्यात आला.