लम्पी आजारावर लसीचे आयोजन : मुनघाटे महाविद्यालयाचा पुढाकार

68

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा येथील गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या उन्नत भारत अभियान व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने उन्नत भारत अभियानांतर्गत दत्तक ग्राम नान्ही, धमदीटोला, नवरगाव, जांभुळखेडा व एरंडी या पाचही गावांमध्ये लम्पी या रोगाच्या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व पशुधन चिकित्सा शिबिराचे आयोजन 20 ते 24 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 7 ते 9 या दरम्यान करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गाय वर्गीय पशुधनांमध्ये लम्पी या चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यामधील पशुधनांमध्ये सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महाविद्यालयातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पशुपालकांनी गुरांची काळजी कशी घ्यावी, या रोगाची लक्षणे, कारणे, उपाय आणि हा रोग रोखण्यासाठी पशुधनांना लस देण्याचे आयोजनही सदर शिबिरात करण्यात आले आहे. याकरिता कुरखेडा येथील पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. भामरे व त्यांच्या संपूर्ण चमूचे सहकार्य लाभणार आहे. दत्तक गावातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी केले आहे.