एनसीसीच्या 5 टक्के गुण वाढीला विरोध : पोलीस भरतीत 5 टक्के जागा राखीव ठेवण्याची उमेदवारांची मागणी

69

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पोलीस भरतीमध्ये एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या उमेदवारांना 5 टक्के गुण देण्याच्या शासनाच्या निर्णयाला आगामी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या वाढीव गुणामुळे मोलमजुरी, शेतमजुरी, काम करून शिकणाऱ्या ग्रामीण उमेदवारावर अन्याय होत असल्याचे बोलून दाखवले आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले की, 2 मार्च 2022 रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे पोलीस भरतीसाठी एनसीसीच्या विद्यार्थ्यांना एकूण गुणांच्या 5 टक्के गुण वाढवून देण्यात येणार आहेत. 15 सप्टेंबर 2022 रोजी गडचिरोली येथील पोलीस भरतीतील उमेदवारांची गुणसूची जाहीर करण्यात आली. यामध्ये एनसीसीच्या उमेदवारांना 5 टक्के वाढीव गुण देण्यात आले. या भरतीत 2 मार्च 2022 रोजी शासन निर्णय याची अंमलबजावणी झाली. त्यामुळे 150 पैकी सर्वाधिक 140 गुण मिळवलेल्या उमेदवार मागे पडला. 5 टक्के वाढीव गुण घेऊन एनसीसीचा उमेदवार 147.50 टक्के गुणासह पहिल्या क्रमांकावर राहिला.

राज्यात लाखो मुले पोलीस भरतीसाठी तयारी करतात. सर्वांकडेच एनसीसीचा अनुभव असणे शक्य नाही. अशावेळी एनसीसीच्या उमेदवारांना पोलीस भरतीमधील एकूण जागेच्या 5 टक्के जागा राखीव ठेवल्यास ते योग्य होईल मात्र त्यांना 5 टक्के गुण वाढ दिल्यामुळे इतर लाखो उमेदवारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे या शासन निर्णयापूर्वीच्या नियमाप्रमाणेच राज्यात पोलीस भरती करावी. हजारो विद्यार्थ्यांचा स्वप्नांवर पाणी पेरण्याचे टाळण्यासाठी निर्णय लवकर घेऊन आगामी काळात होणाऱ्या भरती प्रक्रियेत न्याय मिळेल. यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी उपस्थित होते.