मोठ्या स्वप्नपूर्तीसाठी अथक परिश्रम घेतल्यास यश नक्कीच मिळते : कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांचे प्रतिपादन

101

– आदिवासी विद्यार्थी गुणगौरव सोहळा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : यशस्वी व्हावे हा विचार प्रथम डोक्यात यावा लागतो. ध्येय गाठण्यासाठी विचार केला तर यशाचा मार्ग सापडतो. प्रतिकूूल परिस्थितीतून यश मिळविणे हे अव्दितीय व अभिनंदनीय आहे. इतर प्रगत समाजामध्ये प्रगती करणे व आदिवासी समाजात जन्म घेऊन यश मिळविणे यात खूप फरक आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थतीवर मात करुन जिवापाड परिश्रम घ्या. अपयशाला घाबरु नका. आई-वडील, भाऊ-बहीण, शिक्षक, नातेवाईक, शेजारी हे सर्वजण प्रवाहापर्यंत तुम्हाला नेतील. परंतु प्रवाहात तुम्हालाच पोहायचे आहे. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागते. मोठ्या स्वप्नपूर्तीसाठी अथक परिश्रम घेतल्यास यश नक्कीच मिळते. गोंडवाना विद्यापीठ आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने अतिवृष्टी व जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलेला जागतिक आदिवासी दिन व गुणगौरव सोहळा 12 सप्टेंबर रोजी सोमवारला येथील सुमानंद सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. 9 ऑगष्ट रोजी नियोजित केलेला हा सोहळा प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे ऐनवेळेवर रद्द करावा लागला होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी अंकित व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन, मालार्पण व दीप प्रज्वलीत करुन झाले. कार्यक्रमाची सुरुवात गोंडवाना विद्यापीठ गीताने झाली.

यावेळी आपल्या उद्घाटनपर भाषणात सहायक जिल्हाधिकारी अंकित म्हणाले, आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासींसाठी राबविण्यात येणाऱ्या शिक्षण, आरोग्य, रोजगार व विविध योजनांचा फायदा घ्यावा. आदिवासी समाज निसर्गाचे संरक्षण करतो. आदिवासी संस्कृतीचे जतन व्हावे. आत्मविश्वास वाढवून व कठीण परिस्थितीचा सामना करुन प्रगती केल्यास अनेकांना प्रोत्साहन मिळते. ज्यांचा आज सत्कार झाला त्यांच्याकडून समाजात प्रेरणा जागृत होऊन सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठ राष्ट्रीय सेवायोजना संचालक डॉ. श्याम खंडारे, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती गडचिरोलीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष जितेंद्र चौधरी, उपसंचालक डिगांवर चव्हाण, वरिष्ठ संशोधन अधिकारी गजानन फुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह गडचिरोली, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा गडचिरोली, एकलव्य निवासी पब्लिक स्कुल चामोर्शी व गेवर्धा येथील विद्यार्थी, विद्यार्थिनींंनी आदिवासी पारंपारिक नृत्य सादर करुन कलागुणांची उधळण केली व उपस्थितांचे मने जिंकली.

प्राविण्यप्राप्त विद्यार्थांचा गुणगौरव

या गुणगौरव सोहळयात आदिवासी सेवक पुरस्कारप्राप्त प्रमोद पिपरे यांना गौरविण्यात आले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीने आयोजित सुपर 50 परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेला व आता गोंदिया येथे जी. एम. सी मध्ये एम. बी. बी. एस. ला शिकत असलेला राहुल उसेंडी व नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय सि. ओ. ई. पी. पुणे येथे शिकत असलेला प्रतिक कोल्हे यांचे वडील ईश्वरदास व आई आरती यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे गडचिरोली प्रकल्पाअंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील 10 वी, 12 वीच्या प्राविण्यप्राप्त मुलामुलींचा तसेच नामांकित गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली व पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कुल आरमोरी येथील 10 वीच्या प्राविण्यप्राप्त अशा एकुण 49 विद्यार्थ्याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. सविता सादमवार यांनी केले. आभार प्रदर्शन सहायक प्रकल्प अधिकारी चंदा मगर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर, प्रभु सादमवार, अ.ज.प्र.त.समिती गडचिरोलीचे संशोधन अधिकारी श्रीकांत धोटे, नियोजन अधिकारी प्रफुल पोरेड्डीवार, सहायक लेखाधिकारी दादाजी सोनकर, गजानन बादलमवार, वसंत भिवगडे, मुकेश गेडाम, सुधीर शेंडे, श्रीकांत वेले, एन. वाय. उसेंडी, वासुदेव उसेंडी, संतोष कन्नाके, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.