हे तर वंचितांच्या कल्याणासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे फलित : आ. वडेट्टीवार

40

– सावली येथे शेकडो लाभार्थ्यांना घरकुल प्रमाणपत्रांचे वितरण

विदर्भ क्रांती न्यूज

सावली : समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित व वंचित घटकांपैकी एक असलेल्या विमुक्त भटक्या जाती-जमातीतील नागरिकांपर्यंत शासनाच्या उदासीन धोरणामुळे जनकल्याणकारी योजना पोहोचू शकल्या नाही. राजकारणाचा मूलभूत पाया हा समाजकारण असून अशा दुर्लक्षितांच्या यातना वेचण्याचे काम मी मंत्री पदावरून केले. पदभार स्वीकारतात गोरगरिबांच्या नशिबी रुतलेला दारिद्र्याचा काटा काढण्यासाठी समाजातील अशा गोरगरिबांना हक्काचे घरकुल मिळावे या हेतूने केलेल्या प्रामाणिक कामाचे हे फलित आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सावली येथे आयोजित यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार, सहाय्यक आयुक्त विशेष समाज कल्याण यावलीकर, गटविकास अधिकारी सुनिता मरस्कोल्हे, काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन गोहने, नगराध्यक्ष लता लाकडे, माजी जि. प. सभापती दिनेश चिटनुरवार, ज्येष्ठ कलावंत अनिरुद्ध वनकर, माजी पंं. स. सभापती विजय कोरेवार, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष चुधरी व नगरपंचायतीचे सर्व पदाधिकारी नगरसेवक व नगरसेविका, तालुक्यातील सर्व सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य तथा बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलताना आ. वडेट्टीवार म्हणाले की, देशात लोकशाही शासन आहे. प्रत्येक मनुष्याला मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या निवाऱ्याची निगडीने गरज असते. मात्र आयुष्य पोटाची खळगी भरण्यात जात असल्याने हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास अनेक अडचणी निर्माण होतात. अशा वंचितांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मंत्रीपदावर विराजमान होताच समाजातील उपेक्षित असलेला विमुक्त जाती व भटक्या जमातींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता जिल्ह्यात 2416 इतक्या संख्येने घरकुलास मंजुरी दिली. यात ब्रह्मपुरीत, सिंदेवाही या तालुकयांसह सावली तालुक्यात 598 पैकी 339 घरकुलांना मंजुरी दिली असून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा ऐतिहासिक निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतला असून याचा लाभ समाजातील गोरगरीब व उपेक्षित अशा विमुक्त जाती व भटक्या जमातींना मिळणार आहे. जन आशीर्वादाच्या रूपाने मंत्री पदावरून मिळालेली जनसेवेची संधी आणि त्यातून वंचितांना हक्काचे घरकुल देण्याचे कार्य माझ्या हातून घडले. हेच माझ्या प्रामाणिक कार्याची पावती आहे, असे प्रतिपादन यावेळी केले. यानंतर विशेष समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यावलीकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून विमुक्त भटक्या जाती जमाती करिता हक्काची घरकुल योजनेत चंद्रपूर जिल्ह्यात आ. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याची माहिती मार्गदर्शनातून उपस्थितांसमोर मांडली.

प्रास्ताविकातून गटविकास अधिकारी सुनिता मरस्कोल्हे यांनी तालुक्यातील विविध योजनेअंतर्गत पूर्णत्वास आलेल्या घरकुलांची विस्तृत यशोगाथेची माहिती उपस्थितांसमोर सादर केली. कार्यक्रमास शेकडोंच्या संख्येने लाभार्थी वर्ग काँग्रेस कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते.