मसेली येथील मुलांचे वस्तीगृह व कोरची येथील मुलांमुलींचे वस्तीगृह त्वरित सुरू करण्यात यावे

517

– आदिवासी विद्यार्थी संघाची मागणी

– एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत अप्पर आयुक्तांना पाठविले निवेदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कोरची तालुक्यातील मसेली येथील आश्रमशाळा मुलांचे वस्तीगृह व कोरची येथील मुलामुलींचे वस्तीगृह त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ नागपूर जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत एकात्मिक आदिवासी विकास विभाग गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत आदिवासी विकास विभाग नागपूरचे अप्पर आयुक्त यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जाते. आदिवासींच्या विकासासाठी करोडोचा निधी शासन देतो. परंतु शेवटच्या घटकापर्यंत निधी पोहचत नाही. त्यामुळे शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कोरची येथे आश्रमशाळा मुलांचे व मुलींच्या वस्तीगृह बांधकामासाठी करोडो रुपये खर्च करून बांधकाम करण्यात येऊन 4 वर्षे पूर्ण होऊन सुद्धा बांधकाम पूर्ण झाले नाही. सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून विद्युत पुरवठा अजूनपर्यंत झाला नाही. मात्र प्रकल्प अधिकारी कार्यालय व बांधकाम विभागाचे या कामाकडे लक्ष नाही आणि कंत्राटदार पैसे कळविण्यात धुंद आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे लक्ष द्यायला कुणीच नाही, असे आदिवासी विद्यार्थी संघाने निवेदनात म्हटले आहे.
मसेली आश्रमशाळेची सुद्धा अवस्था सारखीच आहे. बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून विद्युत पुरवठा व इतर सोयी सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. याकडे शासन व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आविसंने निवेदनातून केली आहे. निवेदन देताना आदिवासी विद्यार्थी संघाचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य क्रांती केरामी, पुरूषोत्तम मडावी, कृष्णा केरामी उपस्थित होते.