गडचिरोली पोलिस दलाच्या पोलिस दादालोरा खिडकीला फिक्की स्मार्ट पोलीसिंग पुरस्कार 2021 ने सन्मानित

77

– योजनेच्या यशस्वीतेची फलश्रृती ; कम्युनिटी पोलिसींग या श्रेणीत मिळाला पुरस्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाच्या दादालोरा खिडकीच्या माध्यमातून अतिदुर्गम भागातील युवक – युवतींना रोजगाराच्या संधी आणि नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या पोलीस दलाच्या दादालोरा खिडकीची राष्ट्रीय स्तरावर भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघाने (फिक्की ) दखल घेतली आहे. फिक्कीच्या वतीने देण्यात येणारा फिक्की स्मार्ट पोेलिसींग पुरस्कार – २०२१ हा पुरस्कार गडचिरोली पोलीस दलाच्या दादालोरा खिडकीला प्राप्त झाला आहे. राजधानी दिल्ली येथे आयोजित सोहळयात गडचिरोली पोलीस दलाला ट्राफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी स्विकारला.

पुरस्कार सोहळ्याला माजी केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्लई, युपीचे माजी डीजीपी प्रकाश सिंग यांच्यासह देशभरातील अनेक प्रमुुख अधिकारी उपस्थित होते. गडचिरोली पोलीस दलाची या पुरस्कारासाठी कम्युनिटी पोलीसिंग या श्रेणीतून निवड करण्यात आली. दादालोरा खिडकीच्या माध्यमातून नक्षलग्रस्त भागातील वृध्द, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी, बेरोजगार युवक, युवती, आत्मसमर्पीत नक्षली, नक्षलपीडित तसेच आदिवासी नागरिकांच्या विकासाबाबत गांभिर्याने विचार करून गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती शाखेंतर्गत पोलीस ठाणे, पोलीस मदत केंद्र आदी ५३ ठिकाणी दादालोरा खिडकी सुरू करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून दुर्गम भागात पोहचून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. दुर्गम भागातील नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणणे हा योजनेचा मुख्य हेतू असून योजनेचा हेतू सफल झाला आहे.

गडचिरोली जिल्हयाचा भौगोलिक विचार करता पोलीस दलास अनेक आवाहनांचा सामना करावा लागतो. जिल्हयातील उपविभागीय कार्यालय, पोलीस ठाणे, पोलीस मदत केंद्र येथील पोलीस अधिकारी यांनी अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहचून दादालोरा खिडकीच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी परिश्रम घेऊन उत्कृष्ठ कामगिरी पार पाडली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या कार्याची दखल घेऊन फिक्कीने गडचिरोली पोलीस दलास फिक्की स्मार्ट पोलिसींग हा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. दादालोरा खिडकीस पुरस्कार प्राप्त झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचे कौतूक केले असून भविष्यात अशीच कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे.