स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या की आघाडी करायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार : राकाँ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

51

– शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्याची पत्रपरिषदेतून केली टीका

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे गडचिरोली जिल्हयात आमचा पक्ष चांगल्या प्रकारे वाढला आहे. पक्षाच्या अधिक बळकटीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागेल. जिल्हयात पक्षाचे ३ हजार क्रियाशिल कार्यकर्ते निर्माण केले जातील. आमची महाविकास आघाडी कायम असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढायच्या किंवा आघाडी करायची याबाबत परिस्थीती पाहून जिल्हास्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी गडचिरोली येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलेे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गडचिरोलीचा दौरा करून प़क्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जयंत पाटील म्हणाले की, जिल्हयात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सिरोंचा तालुक्यात मेडीगट्टा धरणामुळे अनेक गावे पाण्याखाली सापडली, तर हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले. संकटाच्या वेळी मदतीसाठी आमचे कार्यकर्ते सर्वात पुढे होते. दरवर्षी पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याने सिरोंचा तालुक्यातील काही गावांचे पुर्नवसन करावे लागणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

गडचिरोली जिल्हयावर अस्मानी संकट कोसळूनही सरकारी मदत अद्यापही पोहचलेली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाही. राज्यात नव्याने स्थापन झालेलेले सरकार आपल्या अंतर्गत प्रश्नातच गुंतले आहे. त्यामुळे या सरकारला जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी वेळच मिळत नाही, असा टोलाही आ. जयंत पाटील यांनी हाणला.
पत्रकार परिषदेला आ. धर्मरावबाबा आत्राम, प्रदेश प्रवक्ते प्रविण कुटे, संघटक युनूस शेख, विभागीय अध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, शहराध्यक्ष विजय गोरडवार उपस्थित होते.