तिसऱ्या दिवशीही पूरपरिस्थिती कायम : हरांबा परिसरातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

70

– पिकांचे अतोनात नुकसान, शेतकरीवर्ग हवालदिल

– शेतकऱ्यांवर ओढवले दुबार व तिबार पेरणीचे संकट

– पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी

– अनेक मार्गावरील वाहतूक तीन दिवसांपासून ठप्प

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गोसेखुर्द प्रकल्प, संजय सरोवर व इतर धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील हरांबा परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आज तिसऱ्या दिवशी सुद्धा पूरपरिस्थिती कायम असून या परिसरातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. त्यामुळे भात पिकांसह इतर विविध पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासन, व प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देऊन नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

यंदा शेतीचा हंगाम सुरू झाल्यापासून तीन ते चारवेळा अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हरांबा परिसरातील भात पिकांसह तूर, तीळ, पोपट, कापूस, सोयाबीन आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पुरामुळे शेती मशागतीसाठी केलेला खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पुरता हवालदिल झाला आहे. या पुरामुळे अनेक मार्गावरील वाहतूक मागील तीन दिवसांपासून ठप्प झाली आहे. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढवले असून यासाठी बियाणे व पैसा कुठून जमवायचा या विवंचनेत शेतकरी वर्ग सापडला आहे. याकडे शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी गांभिर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी हरांबा परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.