दुधमाळा – मिचगाव पूल बांधून देण्यात यावा : धानोरा तालुका भाजयुमोची आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्याकडे निवेदनातून मागणी

190

– विद्यार्थी व नागरिकांसाठी सदर पूल ठरणार महत्त्वपूर्ण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानोरा तालुका वासियांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या दुधमाळा – मिचगाव या मार्गावरील पूल बांधून देण्यात यावा, अशी मागणी धानोरा तालुका भारतीय जनता युवा मोर्चाने गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्याकडे केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले आहे.
धानोरा तालुक्यातील दुधमाळा – मिचगाव मार्गावरील पूल शाळेत ये -जा करणाऱ्या परिसरातील विद्यार्थी तसेच धानोरा तालुकास्थळी जाणाऱ्या मिचगाव, येरंडी, देऊळगाव परिसरातील नागरिकांसाठी सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच या पुलामुळे आरमोरी येथे जाण्यासाठी सुद्धा अंतर कमी पडणार आहे. या मार्गावर पूल नसल्यामुळे मिचगाव, येरंडी, देऊळगाव परिसरातील जनतेला खूप मोठा अंतर पार करून धानोरा तालुकास्थळ गाठावे लागते. यात वेळ आणि पैसा अधिक खर्च होत असून प्रचंड मानसिक व शारीरिक त्रासही सहन करावा लागतो. याकडे शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी गांभिर्याने लक्ष देऊन धानोरा तालुक्यातील दुधमाळा ते मिचगाव या मार्गावरील पूल मंजूर करावा, अशी मागणी धानोरा येथील नगरसेवक संजीव कुंडू, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव सारंग साळवे, प्यारेलाल शेंद्रे, नगरसेवक अनिल मशाखेत्री, अनिकेत गुरुनुले, राकेश उईके, घनश्याम मडावी, नरेश निमालवार यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.