धानोरा येथील तालुका क्रीडा संकुल लवकरच होणार : आमदार डॉ. देवरावजी होळी

63

– जिल्ह्यात क्रीडा संकूल एकही नसल्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रीडा संकूल व्हावे यासाठी आमदारांचे प्रयत्न

– धानोरा व गडचिरोली येथील तालुका क्रीडा संकूल लवकरच व्हावे याकरिता बैठकीचे आयोजन

– ५०१.६९ लक्ष रुपयांंची प्रशासकिय व तांत्रिक मान्यता असूनही निधीअभावी थांबले काम

– लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आमदारांचे आश्वासन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानोरा तालुका क्रीडा संकुल करिता सर्वे नं. ४९४ आराजी १.५६ एवढी जमीन क्रीडा प्राप्त झाली असून सदर जागेचा ताबाही क्रीडा संकुल समितीकडे आहे. तसेच ५०१.६९ लक्ष रुपयांंची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता झालेली असल्यामुळे तो निधी आपण लवकरच मिळवून देऊन धानोरा तालुका क्रीडांगणाचे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी तालुका क्रीडा संकुल समिती धानोराच्या बैठकीमध्ये व्यक्त केला.

या बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, गडचिरोलीचे तहसीलदार श्री. महेंद्र गणवीर, मुख्याधिकारी नगरपंचायत धानोरा श्री. नरेंद्रजी बेंबरे, गटशिक्षणाधिकारी व्ही. आर. येवले, नायक तहसीलदार डी. के. वाळके, क्रीडा समितीचे सचिव एस. बी. भडकवाड, सहाय्यक उपविभागीय अभियंता मनुर्षी मुंदडा, गडचिरोली पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी श्री साळवे, पंचायत समितीचे बीईओ उकंठराव राऊत, श्री. चंदनखेडे यांच्यासह क्रीडा समितीचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

क्रीडा संकुलाच्या प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेनुसार, ४०० मीटर धावनपथ, योगा स्टेज रूप कव्हर सह, बहुउद्देशीय हॉल, प्रेक्षक गॅलरी, प्रसाधन गृहासह, सोलर पॅनल द्वारा फ्लड लाईट सुविधा, एक लक्ष क्षमतेची पाण्याची टाकी, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते व प्रसाधनगृह इत्यादी बाबींचा या मंजूर क्रीडा सुविधांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकही तालुका क्रीडा संकुल नाही ही एक शोकांतिका आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे व निधी मंजूर झालेले आहे किमान त्या तरी ठिकाणी लवकरात लवकर या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामाचा शुभारंभ व्हावा याकरिता आपण प्रयत्नरत असल्याचे आमदार डॉक्टर देवरावजी यांनी बैठकीच्या प्रसंगी म्हटले.

सदर काम निधीअभावी थांबले असून राज्यात भाजपा- सेनेचे सरकार असल्याने लवकरच आपण यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.