धानोरा – मुंगनेर – पेंढरी बस सुरू करावी : भाजयुमोची मागणी

210

– आमदार डॉ. देवराव होळी यांना निवेदन सादर

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा – मुंगनेर – पेंढरी या मार्गे बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी धानोरा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मागील बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर धानोरा ते पेंढरी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. पेंढरी हे गाव छत्तीसगड सीमेलगत असल्याने दोन राज्यांना जोडणारा आहे. धानोरा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने या परिसरातील नागरिकांना तहसीलच्या व इतर तालुकास्तरावरील कामांकरिता धानोरा येथे यावे लागते. तसेच तालुक्यात एकमेव वरिष्ठ महाविद्यालय धानोरा येथे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा शाळा, महाविद्यालयाच्या कामाकरिता धानोरा येथेच यावे लागते. याशिवाय व्यापारी वर्ग व नागरिकांना सुद्धा विविध कामासाठी धानोरा या तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. त्यामुळे धानोरा -मुंगनेर -पेंढरी या मार्गे बस सुरू केल्यास नागरिकांना अंतर सुद्धा कमी पडते आणि वेळेची बातमी होते. त्याकरिता याकडे शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन धानोरा मार्गे मुंगनेर – पेंढरी बस सुरू करून परिसरातील नागरिक, व्यापारी व विद्यार्थ्यांची अडचण दूर करावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव सारंग साळवे, नगरसेवक संजय कुंडू, साजन गुंडावार, लंकेश मशाखेत्री, सुभाष धाईत, घनश्याम मडावी, राकेश खरवडे, राकेश दास, प्यारेलाल शेंद्रे यांनी केली आहे.