स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या हर घर तिरंगा या प्रचार रथाला आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दाखविली हिरवी झेंडी

70

– जिल्हा परिषद गडचिरोली, पंचायत समिती चामोर्शीच्या माध्यमातून हर घर तिरंगा या जनजागृती अभियानाचा शुभारंभ

– पंचायत समितीमधील सेल्फी पॉईंटचेही केले उद्घाटन

– जागतिक आदिवासी दिनाच्या दिल्या समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषद गडचिरोली, पंचायत समिती चामोर्शीच्या माध्यमातून “आजादी का अमृत महोत्सव” हर घर तिरंगा या जनजागृती अभियानाचा शुभारंभ करणाऱ्या प्रचार रथाचे व सेल्फी पॉईंटचे उद्घाटन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते पंचायत समितीच्या आवारात करण्यात आले. यावेळी आमदार महोदयांनी या प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखवून प्रचाराकरिता रवाना केले.

याप्रसंगी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी श्री. पाटील, सहाय्यक बीडीओ वरघंटीवार, विस्तार अधिकारी काळबांदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हुलके, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, महामंत्री साईनाथजी बुरांडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रतिकजी राठी, ओबीसी नेते भोजराजजी भगत यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी तालुक्यातील प्रत्येक घरावर या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रसंगी तिरंगा ध्वज फडकवण्यात यावा यासाठी हे प्रचार रथ चामोर्शी शहरात तालुक्यात फिरणार असून त्या माध्यमातून जनतेला आपल्या घरावरती तिरंगा ध्वज लावण्यासाठी प्रोत्साहित करणार असल्याची माहिती दिली. तिरंगा ध्वज कुठून मिळेल याचीही माहिती या प्रचार रथाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तालुक्यातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज कसा फडकवता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे व संपूर्ण तालुका तिरंगामय करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पंचायत समितीच्या आवारातील सेल्फी पॉईंट येथे स्वतःची सेल्फी काढून या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन केले व अधिकाअधिक लोकांनी या सेल्फी पॉईंटवर येऊन स्वतःचा फोटो काढून प्रचार प्रसार करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी जिल्हा वासियांना ९ ऑगस्ट या क्रांती दिनाच्या व जागतिक आदिवासी दिनाच्या समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छाही दिल्यात.