– स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिम
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर साजरा होत आहे. जनसामान्यांमध्ये देशभक्तीची भावना कायमस्वरूपी राहावी यासाठी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा मोहिम राबविण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्या्तील सर्व नागरिकांनी आपल्या घरांवर अभिमानाने तिरंगा उभारून हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेतून केले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात ग्रामीण 2.38 लक्ष व नागरी 60 हजार असे मिळून 2.98 लक्ष घरांमधे तिरंगा उभारण्याचे उद्दिष्ट प्रशासनाकडून ठरविण्यात आले आहे. यासाठी आवश्यक ध्वज जिल्ह्यात प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आले आहेत. नागरिकांना ग्रामीण भागात ग्रामपंचायत, शाळा तर शहरी भागात नगरपंचायत कार्यालयात ध्वज उपलब्ध होणार आहेत. खाजगी घरांसोबतच 5441 शासकीय, निमशासकीय इमारतींवर, खाजगी 5 हजार आस्थापनांमध्यये तिरंगा उभारण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या उत्साहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव शाळा, महाविद्यालये, क्षेत्रिय कार्यालये याद्वारे साजरा करण्यात येत आहे. हर घर तिरंगा बाबतही माहिती विविध स्तरावर देण्यात येत आहे. सर्व गावांमध्ये व शहरांमध्ये प्रभातफेऱ्या, बॅनर, पोस्टर, हॅण्डबील, ध्वनीक्षेपक संयंत्र, भित्तीचित्रे, पथनाट्य व इतर प्रसार माध्यमांद्ववरे जनजागृती करण्यात येत असल्याने जिल्हाधिकारी मीणा यांनी सांगितले.
नागरिकांनी संपूर्ण तीन दिवस ध्वज उभारावा. ध्वज संहितेचे पालन करून 13 ऑगस्ट रोजी उभारलेला ध्वज 15 ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत लावावा. घरासमोर दर्शनी भागात ध्वज उभारून त्याचा अवमान होणार नाही याची खात्री करून चांगल्या प्रकारे उभारावा. ध्वज हा आपल्या देशाचे प्रतिक असून त्याचा अभिमानपुर्वक सन्मान होईल याची दक्षता सर्व नागरिकांनी घ्यावी, असेही त्यांंनी सांगितले.
9 ते 17 ऑगस्ट दरम्यान स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रमांंचे आयोजन
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सवनिमित्त विविध कार्यक्रमांंचे आयोजन करण्यात आले आहेत. यात 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष सभांचे आयोजन, 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान जिल्हयातील स्वातंत्र्यकालीन माहिती अथवा ऐतिहासिक ठिकाणची माहिती तयार करणे, शालेय/महाविद्यालय स्तरावरुन विविध स्पर्धा, निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धाचे आयोजन, जिल्ह्यातील स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत चित्रांचे व ग्रंथाचे प्रदर्शन, जिल्ह्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांंचे आयोजन, जिल्ह्यातील शासकीय इमारतीवर आजादी का अमृत महोत्सवी लोगो लावणे, 10 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारकांचे सुशोभिकरण, जिल्ह्याच्या मुख्यालयी 75 फुट उंच राष्ट्रध्वज उभारणे, जिल्ह्यातील अनाम वीर, हुतात्मा, शहीद यांची माहिती व सचित्र अनसंग हिरो बुकलेट बनविणे, जिल्ह्यातील वारसा स्थळांची स्वच्छता, कार्यालयांची स्वच्छता अभियान, दि. 12 ते 17 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील अनाम वीर, स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्मे यांचे दुर्मिळ फोटो व त्यांच्या कार्याची माहिती गावातील रस्त्यांच्या कडेला लावणे, संविधान स्तंभाची उभारणी, शासनमान्य लामणदिवा लावणे, 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणी पदयात्रा काढणे, विद्यापीठात विविध कार्यक्रमांंचे आयोजन, 15 ऑगस्ट रेाजी मुख्यालयाच्या ठिकाणी तिरंगी रंगाचे बलुन आकाशात सोडणे, प्रभात फेरीचे आयोजन, एन.सी.सी./ एन.एस.एस. कॅडेटचे संचालन व सायक्लोथॉन, मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी संंजय मीणा यांंनी पत्रपरिषदेत दिली.