केंद्र सरकारच्या विरोधात 5 ऑगस्टला गडचिरोली येथे काँग्रेसचे जेलभरो आंदोलन : महेंद्र ब्राम्हणवाडे

121

– महागाईला केंद्र सरकार जबाबदार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यामध्ये भाववाढ झाली आहे. शिवाय जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटी लावल्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे. या वाढत्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार आहे. त्यामुळे या सरकारच्या विरोधात काँँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या, 5 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता गडचिरोली येथे जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँँग्रेस कमिटीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी आज काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

दिवसेंदिवस वाढती महागाई व बेरोजगारी या प्रश्नांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असून जे सरकार विरोधात तोंड उघडतात त्यांच्यावर ईडीसारख्या यंत्रणा लावून कारवाई केली जात आहे. या अन्यायाविरोधात जेलभरो आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी पत्रपरिषदेत दिली.

जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थिमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. अनेकांची जमीन खरडून गेली आहे. परंतु सरकारकडून अजूनपर्यंत नुकसान भरपाई देण्यात आली नाही. याकडे शासनाने लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी व शेतजमिनीची दुरुस्ती करुन देण्यात यावी, अशी मागणीही ब्राम्हणवाडे यांनी यावेळी केली आहे.
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, शहराध्यक्ष सतीश विधाते, महिला काँँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस डॉ. चंदा कोडवते, डॉ. नितीन कोडवते, महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव भावना वानखेडे, सगुणा तलांडी, तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, रोजगार व स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष दामदेव मंडलवार, समस्या पसुला, भैय्याजी मुद्दमवार, राकेश रत्नावार, रजनीकांत मोटघरे, मिलिंद खोब्रागडे, शालीक पत्रे,  उपस्थित होते.