घोट येथील जिल्हा परिषद महाविद्यालय येथे विज्ञान ११ वीच्या दुसऱ्या तुकडीला मान्यता देऊन तातडीने प्रवेश प्रक्रिया सुरू करा : आमदार डॉ. देवरावजी होळी

101

– जिल्हा परिषद महात्मा गांधी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय घोट येथे यावर्षी इयत्ता अकरावीच्या दुसऱ्या तुकडीला मान्यता न मिळाल्याने विद्यार्थ्यांची होत आहे वाताहत

– गरीब विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया सुरू करावी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मागीलवर्षी जिल्हा परिषद महात्मा गांधी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय घोट येथे विज्ञान ११ वीच्या दुसऱ्या तुकडीला मान्यता देण्यात आली होती. परंतु यावर्षी अजूनपर्यंत ती मान्यता न मिळाल्याने विद्यार्थ्यांची वाताहत होत असून विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश थांबलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर विज्ञान ११ वीच्या दुसऱ्या तुकडीला मान्यता देऊन प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावे, अशी सूचना गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी जिल्हा परिषद गडचिरोलीचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना केली आहे.

आज घोट येथे जिल्हा परिषदेच्या या कनिष्ठ महाविद्यालयाची आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पाहणी केली. यावेळी तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी शहा, महामंत्री सुशांतजी राय, ज्येष्ठ भाजपा नेते जयरामजी चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे, भोजराज भगत प्रामुख्याने उपस्थित होते.

या परिसरामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सरकारी शाळेमध्ये विज्ञान तुकडी केवळ जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय घोट येथेच आहे. परंतु या ठिकाणी मागीलवर्षी प्रमाणे देण्यात येणाऱ्या ११ वी विज्ञान शाखेच्या दुसऱ्या तुकडीला अजुन पर्यंत मान्यता देण्यात आली नाही. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतरत्र धाव घ्यावी लागत आहे. त्यामध्ये गरीब विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होत असून आपण पुढील शिक्षण कसे घ्यावे, असा प्रश्न या गरीब विद्यार्थ्यांपुढे निर्माण झालेला आहे. त्यामुळे काही खाजगी शाळा अशा विद्यार्थ्यांचा लाभ मिळवित आहेत. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर अकरावी विज्ञान च्या दुसऱ्या तुकडीला तातडीने मान्यता देण्यात यावी व प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशी सूचना आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दूरध्वनीवरून शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना केली आहे.