गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा रेड अलर्ट : अत्यावश्यक सेवा वगळता शाळा, महाविद्यालये व इतर बाबी राहणार 16 जुलैपर्यंत बंद

68

– जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थिती कायम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यात 10 जुलैपासून मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे प्रमुख नद्यांसह छोट्या नाल्यांंमधून पाणी वाहत आहे. यामुळे अहेरी, सिंरोचा व भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच गडचिरोली, आरमोरी या भागातही पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे. जिल्हा प्रशासनाने दि. 11 ते 13 जुलै दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता बाकी आस्थापणा बंद राहणार याबाबत आदेश लागू केले होते. आता सदर आदेशाला जिल्हाधिकारी संजय मीना यांनी शनिवार दि. 16 जुलै 2022 च्या मध्यराञीपर्यंत वाढ केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांनी घाबरुन न जाता खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. गडचिरोली जिल्हात कोणत्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी तीन दिवस घरातच कुंटुबाबरोबरच वेळ घालवावा कारण फिरण्यासाठी अथवा अति महत्त्वाचे काम नसताना बाहेर पडल्यास आपल्यासह कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो. जिल्हा प्रशासन पोलिस यंञणासह सर्व घटनांनवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. यामुळे प्रशासनाने निर्णय घेतला आहे की, शनिवार दि. 16 जुलै 2022 शासकीय, निमशासकीय व अत्यावश्यक सेवा वगळता शाळा, कॉलेजेस बाकी आस्थापणा बंद राहणार आहे, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली संजय मीना यांनी कळविले आहे.