Home गडचिरोली गडचिरोलीतील 14 गावांच्या जमीन अधिग्रहणाचा मुद्दा विधानपरिषदेत

गडचिरोलीतील 14 गावांच्या जमीन अधिग्रहणाचा मुद्दा विधानपरिषदेत

34
Oplus_16908288

– आमदार अभिजीत वंजारी यांचा सरकारकडे सवाल

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित असलेल्या स्टील प्रकल्पासाठी करण्यात येत असलेल्या जमीन अधिग्रहणाचा मुद्दा आमदार अभिजीत वंजारी यांनी विधिमंडळाच्या विधानपरिषद सभागृहात उपस्थित केला.

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नव्या अधिसूचनेनुसार चामोर्शी तालुक्यातील 14 गावांमधील सुमारे 3,504 हेक्टर जमीन जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या प्रस्तावित स्टील प्लांटसाठी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

गडचिरोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 14.48 लाख हेक्टर असून त्यापैकी जवळपास 10.98 लाख हेक्टर क्षेत्र वनजमीन आहे. शेतीसाठी उपलब्ध असलेली जमीन केवळ 2 लाख 14 हजार हेक्टर इतकीच आहे. यापैकी सिंचनाखालील क्षेत्र अत्यंत मर्यादित असून फक्त 0.67 लाख हेक्टर जमीनच सिंचनाखाली असल्याचे वंजारी यांनी सांगितले.

अशा परिस्थितीत औद्योगिक प्रकल्पांसाठी वारंवार सुपीक शेती जमीनच अधिग्रहित का केली जाते, असा सवाल स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या जमीन अधिग्रहणाची सातवी टप्प्याची प्रक्रिया सुरू असून यापूर्वीही अनेक टप्प्यांमध्ये अशाच प्रकारे जमीन अधिग्रहित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

चामोर्शी तालुक्यातील संबंधित 14 गावांतील ग्रामस्थांनी या अधिग्रहणाविरोधात ठराव पारित केले आहेत. ग्रामस्थांचा विकासाला विरोध नसून, प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल, असे आश्वासन यापूर्वी देण्यात आले होते; मात्र अपेक्षित प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रस्तावित जमीन अधिग्रहणाचा पुनर्विचार करून प्रकल्पासाठी पर्यायी जागा शोधण्याचा विचार करावा, जेणेकरून गावकऱ्यांची सुपीक शेती जमीन वाचेल, अशी मागणी आमदार अभिजीत वंजारी यांनी सभागृहात केली. तसेच या विषयावर सविस्तर चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी सरकारकडे केली.

error: Content is protected !!