Home गडचिरोली गडचिरोली मेडिकल कॉलेजसाठी डॉ. देवराव होळी आक्रमक

गडचिरोली मेडिकल कॉलेजसाठी डॉ. देवराव होळी आक्रमक

30

– स्वतंत्र इमारत व निधीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी भेट

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीनंतर आता त्यासाठी स्वतंत्र इमारत, प्रशस्त जागा आणि पुरेसा निधी मिळावा, यासाठी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नुकतीच त्यांनी मुंबई येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर निवेदन सादर करत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.

डॉ. होळी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मेडिकल कॉलेजची घोषणा झाली, प्रवेशप्रक्रियाही सुरू झाली; मात्र स्वतंत्र इमारत आणि मूलभूत सुविधा नसतील तर विद्यार्थ्यांचे व रुग्णांचे मोठे नुकसान होईल. गडचिरोलीसारख्या आदिवासी व दुर्गम जिल्ह्यात हे कॉलेज सक्षमपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे. शासनाने याबाबत दिरंगाई करू नये.” वन विभागाची जागा तात्काळ हस्तांतरित करण्याची मागणी
कृषी महाविद्यालयाला लागून असलेल्या जागेवर मेडिकल कॉलेजची स्वतंत्र इमारत उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र संबंधित जागा वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली आहे. याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, याबद्दल डॉ. होळी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

वन विभागाकडील जागा तातडीने वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्ग करावी. प्रशासकीय अडथळ्यांमुळे विकासकामे थांबणे ही दुर्दैवी बाब आहे. शासनाने यासाठी विशेष समन्वय बैठक घेऊन निर्णय घ्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.

निधीअभावी विकासकामांना ब्रेक
स्वतंत्र इमारतीसाठी आवश्यक निधी त्वरित मंजूर करावा, तसेच बांधकामासाठी स्वतंत्र तरतूद जाहीर करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. पुरेशा निधीअभावी नियोजन आणि पायाभूत सुविधा उभारणी रखडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

डॉ. होळी म्हणाले, “गडचिरोलीतील जनतेने अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मेडिकल कॉलेज मिळवले आहे. आता त्याच्या दर्जावर कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन छेडू.”

नागरिकांमध्ये संभ्रम
जागा आणि निधीबाबत ठोस निर्णय न झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मेडिकल कॉलेजची उभारणी पूर्ण क्षमतेने व्हावी, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि नागरिकांनीही एकजूट दाखवावी, असे आवाहन डॉ. होळी यांनी केले. दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र प्रत्यक्ष निर्णय कधी होणार, याकडे आता गडचिरोलीकरांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!