Home गडचिरोली भिक्षावृत्ती थांबवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावी : सागर निंबोरकर यांची मागणी
– गडचिरोलीत महिला-बालभिक्षेकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शहरात अलिकडच्या काळात महिला आणि लहान बालकांसह भिक्षावृत्तीचे प्रमाण चिंताजनक रितीने वाढले आहे. यामुळे शहराची सामाजिक सुरक्षितता आणि बालकांचे भवितव्य धोक्यात आले असून, प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर निंबोरकर यांनी केली आहे.
शहरातील प्रमुख चौक, गजबजलेल्या बाजारपेठा, धार्मिक स्थळे आणि वाहतूक सिग्नलवर महिला आपल्या कडेवर लहान मुलांना घेऊन भिक्षा मागताना दिसत आहेत. उन्हात आणि धुळीत तासन्तास भटकंती करणाऱ्या या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पोषण आणि स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे या मुलांच्या शोषणाची शक्यता बळावली असून, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे निंबोरकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
नोंदणी व पडताळणी : शहरात भिक्षा मागणाऱ्यांची अधिकृत यादी तयार करून त्यांची खरी कौटुंबिक पार्श्वभूमी आणि गरजेची तपासणी करावी. बालकांचे संरक्षण: बालकल्याण समितीमार्फत या मुलांना संरक्षणात घेऊन त्यांच्या शिक्षण आणि आरोग्याची सोय करावी. मुलांचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. महिलांचे पुनर्वसन: भिक्षा मागणाऱ्या महिलांना कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगार गट आणि सरकारी योजनांशी जोडून त्यांना सन्मानाने जगण्याचा मार्ग मिळवून द्यावा.
संयुक्त मोहीम : नगरपरिषद, पोलीस विभाग, बालकल्याण समिती आणि सामाजिक न्याय विभाग यांनी एकत्रित येऊन शहरात नियमितपणे मोहीम राबवावी. भिक्षावृत्ती थांबवणे म्हणजे फक्त कारवाई नव्हे, तर मुलांचे भविष्य आणि महिलांचा सन्मान जपण्याची आपली सामूहिक जबाबदारी आहे. प्रशासनाने आता तरी याकडे गांभीर्याने बघून ठोस निर्णय घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर निंबोरकर यांनी केली आहे.
गडचिरोली शहर भिक्षावृत्तीमुक्त आणि सुरक्षित करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली होणे गरजेचे आहे. सामाजिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी ही मागणी आता जोर धरत असून, जिल्हा प्रशासन यावर काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
error: Content is protected !!