Home गडचिरोली लक्ष्मीनगरातील समस्या सोडविण्यासाठी नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर यांचे आश्वासन

लक्ष्मीनगरातील समस्या सोडविण्यासाठी नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर यांचे आश्वासन

117

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : येथील आरमोरी रोडवरील लक्ष्मीनगरातील समस्या जाणून घेण्यासाठी बुधवार, ३१ डिसेंबर २०२५ रोजी गडचिरोली शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर यांनी भेट दिली. वार्डातील नागरिकांशी मनमोकळीक चर्चा करून समस्या ऐकून घेतल्या व त्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यांच्यासोबत नगरसेवक हर्षल गेडाम, सागर निंबोरकर, राहुल निलमवार उपस्थित होते.

लक्ष्मीनगराला लागूनच असलेल्या आरमोरी रोडवरील तलावाचे पाणी चुकीच्या पद्धतीने व अनधिकृतरित्या वारंवार सोडले जात असल्याने या वार्डातील रस्त्यावर, प्लॉट्समध्ये तसेच काहींच्या घरात पाणी घुसते. त्यामुळे लक्ष्मीनगरवासियांना खूप त्रास होत आहे. या वार्डातील सांडपाण्याची योग्य वहिवाट नाही. नळाचे पाणी सुद्धा येत नाही. सी.सी.रोडचे काम अर्धवट आहे. नाल्यांचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. काही ठिकाणी रस्त्यावरील दिवे बंद आहेत. या सर्व समस्या लक्ष्मीनगरवासियांनी नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्यासमोर मांडल्या. लवकरात लवकर या समस्या सोडविल्या जाव्या, अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांनी केली.

यावेळी वार्डातील नागरिकांनी नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. लक्ष्मीनगरातील समस्या मांडताना प्रामुख्याने वेदप्रकाश कोल्हे, सुधीर शेंडे, राकेश माटेटवार, भास्कर ठाकरे, हिराजी धारणे, रजनीश कोल्हे, गणेश आखाडे, रुपाली कोल्हे, गीता माटेटवार, स्नेहा शेंडे, कल्याणी धाईत, शालिनी धारणे, वंदना बिसेन, पवन धाईत, नरेश गुमडेलवार, गणेश पुलुरवार, स्वप्नील कायरकर, निलिमा जनबंधू, सचिन एनप्रेड्डीवार, प्रवीण गोहणे, डॉ. श्याम खंडारे, प्रकाश झिंगरे, बंडू निंबोरकर, रतन देशपांडे, मनिषा लाकडे, दीपाली उपरीकर, मंगेश कोतपल्लीवार, नितीन कानकाटे आदींसह वार्डातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!