– आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथील घटना
– नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथे वाघाच्या हल्ल्यात एक वृद्ध महिला ठार झाल्याची घटना मंगळवार, २ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. कुंदा खुशाल मेश्राम (वय ६३) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. १२ दिवसांत या परिसरातील ही दुसरी घटना असल्याने ऐन धान कापणीच्या हंगामात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कुंदा मेश्राम ही महिला सकाळी ११ वाजता शेतावर गेली होती. दुपारी त्यांचा नातू किसन त्यांना घरी आणण्यासाठी गेला असता त्या शेतात आढळून आल्या नाहीत. कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी शोध घेतला असता, शेतापासून काही अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. कुंदा मेश्राम यांच्या पतीचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा व तीन मुली आहेत.
यापूर्वी २० नोव्हेंबर रोजी इंजेवारी परिसरातील देऊळगाव बुटी येथील मुक्ताबाई नेवारे व अनुसया वाघ या दोन महिलांना सुद्धा वाघाने ठार केले होते. त्यानंतर अवघ्या १२ दिवसांतच ही दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सध्या धान कापणी व मळणीचा महत्त्वाचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी आणि शेतमजूर महिलांना शेतावर जाणे अत्यंत कठीण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार यांनी कुंदा मेश्राम यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. शासनाने मेश्राम यांच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी अमोल मारकवार यांनी केली. त्यांनी वनविभागाने या नरभक्षक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.






