Home गडचिरोली गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी कमळ फुलवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी कमळ फुलवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

55

– भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत असल्याने अतिदुर्गम, आदिवासीबहुल ही ओळख पुसल्या जात आहे. विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असून आज हा जिल्हा ‘स्टील हब’ म्हणून ओळखला जातोय. तब्बल ३ लाख कोटींची गुंतवणूक येथे येत आहे. या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये कमळ फुलवा, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

गडचिरोली येथील नगराध्यक्ष पदाचे भाजपाचे उमेदवार ॲड. प्रणोती सागर निंबोरकर, आरमोरी येथील रुपेश पुणेकर आणि देसाईगंज (वडसा) येथील लता सुंदरकर तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ गडचिरोली येथील धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या समोरील पटांगणावर भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जाहीर सभेला आमदार डॉ. मिलींद नरोटे, आमदार बंटी भांगडिया, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार कृष्णा गजबे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, किसान आघाडीचे रमेश भुरसे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे यांच्यासह नगराध्यक्षा व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

विकासात गडचिरोली मागे राहू नये म्हणून येत्या काळात ‘बाह्य रिंग रोड’ मंजूर करण्यात येणार आहे. आम्ही आधुनिक गडचिरोली घडवतो आहोत, पण त्याचवेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या स्वप्नातील ‘जल-जमीन-जंगल’ आणि भूमिपुत्रांच्या हिताचे संरक्षण हेच आमचे प्रथम कर्तव्य राहणार आहे. कौशल्यविकास, वैद्यकीय शिक्षण, नवीन उद्योग, सर्व सुविधांनी युक्त गडचिरोली उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गडचिरोली शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता १३० कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेलाही लवकरच मान्यता देणार आहोत. प्रत्येक घरात ३६५ दिवस नळाद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे हा आमचा निर्धार आहे. याचा एक टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा सुरू होणार आहे. भुयारी गटारांची कामेही याच वेगाने पुढे नेऊ. लांजेडा, गोकुळनगर, विवेकानंदनगर, इंदिरानगर यासारख्या भागातील नागरिकांकडे जमिनींचे मालकीहक्क नसल्यामुळे त्यांना घरकुल योजना मिळत नव्हती. काही महिन्यांपूर्वी आम्ही सर्व अतिक्रमण नियमित करण्याचा मोठा निर्णय घेतला. आता मोजणी करून हे पट्टे देण्यात येतील आणि ज्यांच्याकडे कच्ची घरे आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २.५ लाख देऊन पक्की घरे बांधून दिली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवली.

उद्योगांसाठी जमिनी लागतील मात्र आम्ही एकाही शेतकऱ्याचे नुकसान होऊ देणार नाही. योग्य मोबदला आणि सन्मानपूर्वक पुनर्वसन झाल्याशिवाय कोणताही प्रकल्प पुढे जाणार नाही, हा माझा शब्द आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

या जाहीर सभेला जिल्हाभरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

error: Content is protected !!