Home गडचिरोली जुन्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून नवख्यांना संधी देणार का भाजपा? गडचिरोलीत चर्चेला उधाण

जुन्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून नवख्यांना संधी देणार का भाजपा? गडचिरोलीत चर्चेला उधाण

58
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आगामी नगर परिषद निवडणुकीत अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी भाजपात सध्या चर्चेला वेग आला आहे. मात्र, अलीकडे नवख्या चेहऱ्यांना प्रमुख पदांसाठी प्राधान्य दिल्याची चर्चा रंगू लागल्याने पक्षातील जुन्या, निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पक्षासाठी अनेक वर्षे जीव ओतून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून, भाजपाच्या विचारधारेपासून दूर असलेल्या नवख्या व्यक्तींना अध्यक्षपदासारखी जबाबदारी देण्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे की, “राजकारणात अनुभव नसलेल्या नवख्यांना थेट अध्यक्षपद देणे योग्य नाही. प्रथम त्यांना नगरसेवक किंवा इतर जबाबदाऱ्या देऊन त्यांची कार्यक्षमता तपासली पाहिजे.”

या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये एका अनुभवी महिला नेत्या यांचे नाव ठळकपणे पुढे येत आहे. त्या पूर्वी नगरपरिषद अध्यक्ष राहिल्या असून सध्या भाजपाच्या महिला जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. पक्षाच्या महिला आघाडीतून आणि संघटनात्मक पातळीवरील त्यांनी अनेक वर्ष नेतृत्व करत पक्षसंघटन बळकट केले आहे.

त्याच्या कार्यकाळात गडचिरोली शहरात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि शहराच्या सौंदर्यीकरणासाठी अनेक महत्वाची विकासकामे मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली शहराचे रूप पलटले असून, त्यांनी महिलांच्या नेतृत्वाचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. आजही नागरिक त्यांच्या प्रामाणिक कार्यपद्धतीची, पारदर्शकतेची आणि समर्पणभावाची दाद देताना दिसतात.

दरम्यान, नागरिकांमध्ये आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे, “नवख्यांना निवडून दिल्यास गडचिरोली शहराचा विकास कसा करणार? जनतेच्या समस्या कसा सोडवणार? शहराच्या पायाभूत सुविधांसाठी आणि विकासासाठी कोणत्या ठोस उपाययोजना केल्या जाणार?” शहराच्या विकासाचा आराखडा तयार करून तो शासनदरबारी प्रभावीपणे मांडू शकतील का, याबाबत नागरिक शंका व्यक्त करत आहेत.

इतक्या वर्षांत समाजकारणात किंवा जनतेसाठी काहीच न केलेल्या व्यक्तींना केवळ निवडणुकीच्या तोंडावर समाजसेवेचा आव आणून पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार का, असा सवालही नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांचा ठाम सूर असा आहे की, “निष्ठावान, अनुभवी आणि विचारधारेशी एकनिष्ठ कार्यकर्त्यांनाच संधी मिळाली पाहिजे; अन्यथा कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होईल.”

आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि कार्यकर्त्यांची एकमुखी मागणी आहे, अध्यक्षपदाची उमेदवारी माजी नगरपरिषद अध्यक्ष यांनाच द्यावी, जेणेकरून पक्षनिष्ठा, संघटनशक्ती आणि स्थानिक जनभावना या तिन्हींचा सन्मान राखला जाईल आणि भाजपाचा विजय निश्चित होईल.

error: Content is protected !!