Home गडचिरोली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली पोलीस दलातर्फे रन फॉर युनिटी मॅरेथॉनचे...

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली पोलीस दलातर्फे रन फॉर युनिटी मॅरेथॉनचे आयोजन

41

– पोलीस मुख्यालय, उपमुख्यालयासह सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथेही रन फॉर युनिटी-मॅरेथॉनचे आयोजन

– विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्रांचे वितरण

– एकता दिनानिमित्त सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे घेण्यात आली निबंध स्पर्धा

– संपूर्ण जिल्हाभरात एकत्रितपणे 10540 स्पर्धकांनी नोंदविला मॅरेथॉनमध्ये सहभाग

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दरवर्षी 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. यासोबतच भारतीय एकतेचे शिल्पकार आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती देखील साजरी केली जात असते. जिल्ह्रातील नागरिकांमध्ये एकता, अखंडता आणि बंधुभावाची भावना दृढ करण्यासाठी तसेच संविधानात्मक मुल्यांचे जतन करण्यासाठी पोलीस स्मृती दिन व एकता दिनाचे औचित्य साधून तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालय गडचिरोली, पोलीस उपमुख्यालय प्राणहिता सह सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे 31 ऑक्टोंबर 2025 रोजी ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले.

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6 वाजता पोलीस कवायत मैदान गडचिरोली ते कारगिल चौकपर्यंंत सदर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. सदर मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी हिरवी झेडी दाखवून केले. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी, पोलीस उपअधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली श्री. सुरज जगताप व पोलीस अधिकारी/अंमलदार, जेष्ठ नागरिक, युवक/युवती आणि विद्यार्थी-विद्यार्थींनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला व शेवटी या मॅरेथॉनचा शहिद पांडु आलाम सभागृह येथे समारोप करण्यात आला.

सदर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी धावपटूंनी एकात्मतेचा संदेश देणारे बॅनर, झेंडे आणि फलक हातात घेऊन उत्साहाने धाव घेतली. तसेच सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्साहाने धाव घेत सरदार पटेल यांच्या कार्यातून प्ररेणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी पोलीस बॅड पथकाच्या वतीने राष्ट्रभक्तीपर धून वाजवून स्पर्धकांचे मनोबल वाढविले. यासोबतच सहभागी स्पर्धकांपैकी प्रथक, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या युवक-युवतींना पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते रु. 5000/-, रु. 3000/- व रु. 2000/- रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच सहभागी वरिष्ठ अधिका­यांना देखील प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

सदर कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “या मॅरेथॉनचा उद्देश केवळ धावणे नसून, जिल्ह्रातील नागरिकांच्या मनात एक भारत, श्रेष्ठ भारत ही भावना दृढ करणे आहे. गडचिरोली जिल्ह्रातील प्रत्येक नागरिक, विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी व अंमलदार एकतेच्या या संदेशाचा भाग बनतोय, ही अभिमानाची बाब आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातुन गडचिरोली जिल्ह्रात आता सशक्त पिढी घडत आहे व ही पिढी गडचिरोली पोलीस दलाचा भाग होणार, अशी आशा व्यक्त करुन मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी सर्वाचे मी अभिनंदन करतो.”
मॅरेथॉन संपल्यावर सर्व सहभागींना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यासोबत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त तसेच एकता दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच मंत्रालय स्टाफ याच्या उपस्थितीत ‘राष्ट्रीय एकता शपथ’ घेण्यात आली. यासोबतच सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर सुद्धा सदर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, सहभागी स्पर्धकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. या मॅरेथॉन स्पर्धेसोबतच एकता दिनाचे औचित्य साधून सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली श्री. सुरज जगताप हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे पोउपनि चंद्रकांत शेळके व सर्व पोलीस अंमलदार तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!