– इंदिरानगर (गडचिरोली) येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : तथागत बुद्धांनी राजवैभव सोडून मानसाच्या कल्याणासाठी ज्या मार्गाचा शोध लावला. तो मार्ग म्हणजे धम्म होय. आजच्या विज्ञानवादी युगात व जगातील अशांत युद्धमय वातावरणात भगवान बुद्धाच्या मार्गानेच मानवाचा कल्याण साधता येतो, असे मत डॉ. योगीराज कऱ्हाडे यांनी व्यक्त केले.
काल, २ ऑक्टोबर २०२५ रोजी इंदिरानगर (गडचिरोली) येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामीण विकास शिक्षण संस्था चुरमुराचे संस्थापक डॉ. राजकुमार शेंडे, बामसेफचे जिल्हा संयोजक डॉ. योगीराज कऱ्हाडे तर अध्यक्ष म्हणून तथागत बौद्ध समाज मंडळ इंदिरानगरचे अध्यक्ष सतीश भानारकर व प्रमुख पाहुणे म्हणून आशिष मेश्राम, रमेश सहारे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. योगीराज कऱ्हाडे पुढे म्हणाले की, तथागत बुद्धांनी कठीण तपस्या व तत्कालीन विद्वान व तत्वज्ञांनी यांच्याकडून दार्शनिक शिकून स्वतःच्या अनुभवावरून दुःख मुक्तीचा मार्ग शोधून काढला. त्या मार्गाचा आपण जीवनात आचरण करू तरच आपला सर्वंकष उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. राजकुमार शेंडे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आशिष घोनमोडे यांनी केले. तसेच लालाजी नगराळे, तेजकिरण उराडे, सम्बोधी खोब्रागडे यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन सचिन पाटील यांनी तर आभार प्रदर्शन भाग्यश्री नंदेश्वर यांनी केले.
यावेळी इंदिरानगर येथील बौद्ध बांधव व भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता इंदिरानगर येथील तथागत बौद्ध समाज मंडळ व रमाई महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.







