Home गडचिरोली जीएसटी दरकपातीने सर्वसामान्यांना मोठा दिलासा : आ. डॉ. मिलिंद नरोटे

जीएसटी दरकपातीने सर्वसामान्यांना मोठा दिलासा : आ. डॉ. मिलिंद नरोटे

52

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी जीएसटी दरकपात हा सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा व समाधानाचा महामार्ग ठरणार आहे. त्यातूनच शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे देशातील गरिबी दूर होण्यासोबतच रोजगारनिर्मिती वाढून आणि भ्रष्टाचाराला आळा बसून आर्थिक स्थिती बळकट होत आहे. यापूर्वीच्या सरकाराने केलेल्या अनियमिततेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने आर्थिक सुधारणा करत देशाला विकासाच्या मार्गावर आणले असल्याचे आमदार डॉ. नरोटे यांनी म्हटले आहे.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असून मागील चार वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने राबविलेल्या योजनांचा थेट फायदा ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना झाला आहे. सन २०१४ नंतर भारताची जागतिक पातळीवर प्रतिमा उंचावली असून, भ्रष्टाचारमुक्त व स्थिर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा विश्वासार्ह प्रयत्न झाला आहे. राज्य सरकारच्या सहकार्याने प्रत्येक जिल्ह्यात पायाभूत सुविधा, शिक्षण, उद्योग व व्यापारवाढीस चालना मिळत असून, गडचिरोली जिल्ह्यातही विकासकामांना गती मिळणार आहे, असे ते यावेळी म्हणाले.

पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, डॉ. नितीन कोडवते, जिल्हा महामंत्री गिताताई हिंगे, महिला जिल्हाध्यक्ष योगिताताई पिपरे, भाजपा ओबीसी ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहणकर, भाजपा शहर अध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपा ज्येष्ठ नेते सुधाकर यगंधलवार, अविनाश विश्रोजवार, विनोद देवोजवार, देवाजी लाटकर, विवेक नवघडे, नरेश हजारे, रमेश नैताम, वर्षा शेडमाके, सीमा कन्नमवार आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!