Home गडचिरोली साहित्य अकादमीच्या वतीने 30 ऑगस्टला चांदाळा येथे ‘ग्रामालोक’ कार्यक्रमाचे आयोजन

साहित्य अकादमीच्या वतीने 30 ऑगस्टला चांदाळा येथे ‘ग्रामालोक’ कार्यक्रमाचे आयोजन

97
Oplus_16908288

– नाट्यकलाकार व साहित्यिकांच्या कलेचे होणार सादरीकरण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीच्या वतीने गडचिरोली तालुक्यातील चांदाळा येथील माध्यमिक आश्रमशाळेत शनिवार, 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता ‘ग्रामालोक’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नाटककार आणि आदिवासी साहित्यिक आपले सादरीकरण करणार आहेत.

ग्रामीण परिसरातील लोककला, लोकजीवन आणि साहित्य यांना व्यासपीठ मिळावे यासाठी भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाअंतर्गत ‘ग्रामालोक’ कार्यक्रमाचे आयोजन ग्रामीण भागात केले जात आहे. त्या अनुषंगाने चांदाळा येथे कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नवरगाव येथील झाडीपट्टीचे सुप्रसिद्ध लेखक व नाट्यकलावंत प्राचार्य सदानंद बोरकर भूषविणार आहेत. यावेळी गडचिरोली येथील सुप्रसिद्ध नाटककार चुडाराम बल्हारपुरे आणि कुरखेडा तालुक्यातील एरंडी येथील नाटककार विश्वंभर गहाणे आपल्या नाट्यनिर्मितीचे अनुभव कथन करणार आहेत. तसेच येथील सुप्रसिद्ध आदिवासी कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कुसुमताई अलाम या आदिवासी साहित्य व संस्कृतीबद्दल मार्गदर्शन करणार असून पुराडा येथील लेखिका श्रीमती संगीता ठलाल या झाडीपट्टीतील रानभाजी व वनौषधीबद्दल आपले अनुभव कथन करणार आहेत.

या कार्यक्रमाला साहित्य अकादमी नवी दिल्लीचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे उपस्थित राहणार असून माध्यमिक आश्रमशाळा चांदाळा येथील मुख्याध्यापिका श्रीमती यशोधरा उसेंडी या आभार प्रदर्शन करणार आहेत. या ग्रामालोक कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक सतीश पवार यांनी केले आहे.

error: Content is protected !!