विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, २९ जुलै : शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, शेतकऱ्यांना बोनस देऊ, पीक विम्याचा लाभ देऊ असे अनेक आश्वासने निवडणुकीदरम्यान आपल्या भाषणातून नेत्यांनी दिले होते. परंतु शेतकऱ्यांचे हे प्रश्न अजूनही पूर्ण झालेली नाहीत. यावरून निवडणुकीत जनतेला दिलेल्या आश्वासनांचा सत्ताधाऱ्यांना आता विसर पडला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथील सर्कीट हाऊस विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
धानाला आधारभूत किंमत नाही. ८० टक्के शेतकऱ्यांना अद्याप बोनस मिळालेला नाही. खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक लाडक्या बहिणींना अपात्र ठरविण्यात येत आहे. पोलिसांवर हल्ले वाढले, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिला अत्याचाराविरोधात आघाडी सरकारने आणलेला शक्ती कायद्याचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे. राज्यातील कंत्राटदारांची ९० हजार कोटींचे देयके अद्याप मिळालेली नाहीत. पीक विम्याकरिता चुकीचे निकष लावण्यात आले. गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. असे शेकडो गंभीर प्रश्न सरकार समोर असताना ते सोडविण्याऐवजी सत्ताधारी मात्र राजकारणात व्यस्त असल्याची टीकाही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रपरिषदेतून केला आहे.
संयुक्त राष्ट्रात दहशतवादाला रोखण्यासाठी ईडी कायदा निर्माण झाला. पण भारतात ईडीला राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी वापरले जात आहे. असाच गैरवापर विशेष जनसुरक्षा कायद्याचाही होईल, असा आरोप देशमुख यांनी केला. दहशतवादाला मिळणाऱ्या पाठबळाला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रात ‘ईडी’ सारखा कायदा निर्माण करण्यात आला होता. भारतात २००४ मध्ये हा कायदा अंमलात आला. परंतु या कायद्याचा वापर राजकीय सूड उगवण्यासाठी करण्यात येत आहे. नुकताच राज्याच्या विधिमंडळात सत्ताधाऱ्यांनी पाशवी बहुमताच्या जोरावर विशेष जनसुरक्षा विधेयक पारीत केले. येणाऱ्या काळात या कायद्याचा वापर सत्तेच्या विरोधात मतप्रदर्शन करणारे राजकीय नेते, शेतकरी, चळवळीतील कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्या विरोधात होणार आहे. ‘ईडी’च्या गैरवापरासंदर्भात यासंदर्भात नुकतेच सरन्यायाधीशांनी फटकारल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, सरचिटणीस सुरेश सावकार पोरेड्डीवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, शाहीन हकीम, शहराध्यक्ष विजय गोरडवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.







