Home गडचिरोली पालकमंत्री वाढदिवसाचे ‘रिटर्न गिफ्ट’ जिल्ह्याला काय देणार?

पालकमंत्री वाढदिवसाचे ‘रिटर्न गिफ्ट’ जिल्ह्याला काय देणार?

75

– काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ब्राह्मणवाडे यांचा पत्रपरिषदेत प्रश्न

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्ह्याला विकासाचे काय ‘रिटर्न गिफ्ट’ देणार? असा प्रश्न काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या, २२ जुलै रोजी गडचिरोली दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री फडणवीस गडचिरोलीत आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा आणि सत्कार नको, तर जिल्ह्याच्या प्रलंबित विकासकामांना गती मिळावी, अशी अपेक्षाही ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केली आहे.

या पत्रकार परिषदेला आरमोरी क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, प्रभाकर वासेकर, शंकरराव सालोटकर, रमेश चौधरी, मिलिंद खोब्रागडे, वामन सावसागडे, घनश्याम वाढई, वसंता राऊत, रजनीकांत मोटघरे आदींची उपस्थिती होती.

महेंद्र ब्राम्हणवाडे पुढे म्हणाले, खऱ्याअर्थाने दिवंगत आर. आर. पाटील (आबा) यांनी जिल्ह्याच्या विकासाला दिशा दिली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक दौरे करून जनतेच्या समस्यांचे निराकरण केले. स्थानिक आदिवासी, ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी गोंडवाना विद्यापीठ, कृषी महाविद्यालय सुरू केले. महिला रुग्णालय मंजूर करून ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उभे रहावे यासाठी इमारतींचे बांधकाम केले. स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्या याकरिता स्थानिक पातळीवर पोलिस भरती प्रक्रिया राबवून रोजगार उपलब्ध करून देण्यात आले.

मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री फडणवीस यांच्या तीन वर्षांतील कार्यकाळात जिल्ह्यात 2 हजाराहुन अधिक विविध पदे रिक्त आहेत. अर्ध्या शेतकऱ्यांना बोनसचे पैसे मिळाले नाही. रानटी डुकर व हत्तींकडून शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यावर अजूनही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाही. अनेक समस्या जिल्ह्यात आवासून उभ्या असतानासुद्धा त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केला आहे.

विकासाच्या थापा मारणारे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस मंगळवार, 22 जुलैला जनतेला चॉकलेट व लालीपॉपचे वाटप करून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात साजरा करण्यात येणार असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष ब्राम्हणवाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

error: Content is protected !!