Home गडचिरोली देशात आणीबाणी लावून काँग्रेसने लोकशाहीची हत्या केली

देशात आणीबाणी लावून काँग्रेसने लोकशाहीची हत्या केली

67

– आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचा तीव्र आरोप

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सन १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व काँग्रेस सरकारने देशात आणीबाणी लादून लोकशाहीची गळचेपी केली. संपूर्ण देशावर हुकूमशाही लादण्यात आली. संविधानावर प्रहार करत नागरिकांचे मूलभूत हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आणि प्रसारमाध्यमांची मोकळीक पूर्णतः काढून घेतली गेली. पत्रकारांना अटक करण्यात आली, विरोधकांना जेलमध्ये डांबले गेले, सामान्य जनतेचे हक्क हिरावून घेतले गेले हे सर्व काँग्रेसने केले, असा आरोप गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केला.

भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या वतीने २५ जून हा ‘आपत्काल दिन’ काळा दिवस म्हणून आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कर्तव्य कक्ष गडचिरोली येथे पाळण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी १९७५ मधील घटनाक्रम उलगडत सांगितले की, रायबरेली मतदारसंघातील इंदिरा गांधी यांची निवडणूक न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली होती व त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्या निर्णयाविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली. मात्र, अंतिम निर्णय येण्याआधीच त्यांनी राष्ट्रपतींकडून देशात आणीबाणी जाहीर करून २१ महिने अघोषित हुकूमशाही लादली. या काळात जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह लाखो कार्यकर्ते व नागरिकांना तुरुंगात डांबण्यात आले. मीडियावर नियंत्रण आणले गेले आणि लोकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणली गेली. या काळात जे काही घडलं, त्यामुळं खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाहीची हत्या काँग्रेस पक्षाने केली होती, असे तीव्र आरोप आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

यावेळी मंचावर भाजप जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी आमदार डॉ. नामदेवजी उसेंडी, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर, प्रमोदजी पिपरे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे, जिल्हा उपाध्यक्ष चंदाताई कोडवते, तालुकाध्यक्ष दत्तूजी सूत्रपवार, शहराध्यक्ष अनिलजी कुनघाडकर, माजी तालुकाध्यक्ष विलासजी भांडेकर उपस्थित होते.

error: Content is protected !!