– युवासेनेचे पवन गेडाम यांच्यावर पक्ष कार्यकर्त्याचा आरोप
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा) गटाचे युवासेना जिल्हाध्यक्ष पवन राघो गेडाम या माझ्याच पक्षातील पदाधिकाऱ्याने जुनी स्कॉर्पिओ खरेदी करून देण्याच्या नावाखाली 25 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा व त्यांच्या आर्थिक स्त्रोताची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाचे कार्यकर्ते ॲड. मिनार खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
पत्रकार परीषदेत माहिती देताना ॲड. मिनार खोब्रागडे म्हणाले की, १९ ऑक्टोबर २०२४ रोजी शिवसेना (उबाठा) युवासेना जिल्हाध्यक्ष पवन राघो गेडाम यांनी मला फोनद्वारे कळविले की, मी तुला एक सेकंडहँड स्कॉर्पिओ गाडी खरेदी करून देतो, परंतु त्यासाठी पूर्वी बुकिंग करावी लागेल. त्याकरिता बुकिंग रक्कम म्हणून २५ हजार रुपये द्यावे लागतील व उर्वरित रक्कम गाडीची डिलिव्हरी झाल्यानंतर द्यावी लागेल, असे सांगितले. हे पैसे पत्नी योगीता पवन गेडाम यांच्या फोनपे नंबरवर टाकण्यास सांगितले. त्यानंतर मी पवन राघो गेडाम यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांची पत्नी योगीता पवन गेडाम यांच्या फोन पे नंबर ८४८४९०९५४८ या नंबरवर २५००० रुपये १९ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी २:४५ वाजता पाठविले. त्यानंतर पवन राघो गेडाम यांनी डिसेंबर महिन्यात तुम्हाला गाडी देऊ असे सांगितले. जेव्हा डिसेंबर महिन्यामध्ये मी अद्याप गाडी न मिळाल्याने पवन गेडाम यास फोन करून विचारले असता काही कारणाने गाडी बुक होऊ शकली नाही. त्यामुळे तुम्हाला जानेवारी महिन्यात गाडी पाठवतो असे सांगितले. मी जानेवारी महिन्य्यात फोन केला असता पवन राघो गेडाम यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यानंतर पवन राघो गेडाम यांनी फोन उचलणे बंद केले. काही दिवसानंतर मी पवन राघो गेडाम यांना गाडी किंवा पैसे वापसीबद्दल विचारणा केली असता “तुम्हाला तुमचे पैसे तसेच गाडी देणार नाही तुम्हाला काय करायचे ते करून घ्या” अशी धमकी दिल्याचे ॲड. मिनार खोब्रागडे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
पवन राघो गेडाम यांचा सेकंडहॅंड गाडी विक्रीचा कुठलाही नोंदणीकृत व्यवसाय नाही. त्याने मला गाडी विक्रीचा व्यवसाय करतो असे खोटेनाटे सांगून माझ्याकडून गाडी खरेदी करण्याकरिता बुकिंग रक्कम २५००० रुपये घेतले असून माझी आर्थिक फसवणूक केली आहे. त्या अनुषंगाने मी ६ मार्च २०२५ रोजी पोलिस स्टेशन गडचिरोली येथे जाऊन लेखी फिर्याद दिली होती. मी १९ ऑक्टोबर २०२४ रोजी घडलेल्या घटनेबाबत तक्रार प्रत्यक्ष पोलिस स्टेशन गडचिरोली येथे जाऊन दिली होती. परंतु पोलिस स्टेशनमधून मला सांगण्यात आले की हे दिवाणी प्रकारचे प्रकरण आहे. त्यामुळे तुम्ही न्यायालयात दाद मागावी, अशी माहिती ॲड. मिनार खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.