– माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी अंत्यविधीस उपस्थित राहून वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : चामोर्शी जवळील ग्रामीण रुग्णालयासमोरील मार्गावर रविवारी (दि. १८ मे) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गडचिरोलीतून आष्टीकडे जात असताना कारने युटर्न घेत असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे संपूर्ण गडचिरोली व चामोर्शी परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये गडचिरोली येथील हनुमान नगरातील तेली मोहल्ल्यातील विनोद पुंजाराम काटवे, राजू सदाशिव नैताम, सुनील वैरागडे तसेच चामोर्शी येथील अनिल सातपुते यांचा समावेश आहे.
या मृतांची अंत्यसंस्कार विधी आज सोमवारी गडचिरोली येथील बोरमाळा नदी घाटावर अत्यंत शोकमय वातावरणात पार पडले. याप्रसंगी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी स्वतः उपस्थित राहून मृतांना मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले.
विशेषतः माजी शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांचे बंधू विनोद काटवे यांच्या निधनामुळे मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांनी नदीच्या तीरावर स्वतः उपस्थित राहून त्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला. या अंत्यविधीस गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, समन्वयक प्रमोदजी पिपरे, शहराध्यक्ष अनिलजी कुनघाडकर, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव गोवर्धनजी चव्हाण, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर, विश्व हींदु परिषदचे नेते सुशिलजी हिंगे, चंद्रपूर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाल, विलास पा. भांडेकर, मधुकरजी भांडेकर, विनोद देवोजवार, बंडूजी झाडे, केशव निंबोड, संतोष भांडेकर, रमेश नैताम, किर्तीकुमार मासुरकर, तसेच मोठ्या संख्येने नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिक जनता उपस्थित होते.
ही दुर्घटना संपूर्ण समाजमन हेलावून टाकणारी असून, एकाच वेळी चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मृतांच्या आत्म्यांना शांती लाभो, हीच सर्वांनी मौन पाडून ईश्वर चरणी प्रार्थना केली.







