Home गडचिरोली ऐतिहासिक रात्रीसाठी गडचिरोली सज्ज : जीडीपीएल प्रीमियर लीग फायनल, पुरस्कार सोहळा व...

ऐतिहासिक रात्रीसाठी गडचिरोली सज्ज : जीडीपीएल प्रीमियर लीग फायनल, पुरस्कार सोहळा व सोनू निगम यांचा ग्रँड कॉन्सर्ट

101

– विजेत्या संघाला 11 लाखांचे बक्षीस

– 20 हजारांपेक्षा अधिक प्रेक्षकांची राहणार उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, दि. १८ : गडचिरोली जिल्हा प्रीमियर लीगचा रोमांचक अंतिम सामना, पुरस्कार वितरण समारंभ आणि सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या ऐतिहासिक संगीत मैफिलीसह एक अभूतपूर्व क्रीडा आणि मनोरंजन पर्व उद्या बुधवार, १९ मार्च २०२५ रोजी कॉम्प्लेक्स परिसरातील MIDC मैदान गडचिरोली येथे साकार होणार आहे. या कार्यक्रमाला 20 हजारांपेक्षा अधिक प्रेक्षकांची उपस्थिती राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार आयोजकांच्या वतीने प्रेक्षकांसाठी तशी सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

गडचिरोली प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात गडचिरोली हरिकेन्स आणि गडचिरोली कमांडो पोलीस संघ यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे. हा हाय-व्होल्टेज सामना दुपारी ४ ते ७ या वेळात खेळला जाणार आहे. त्यानंतर संघांमधील उत्कृष्ठ खेळाडूंच्या योगदानाची दखल घेत संध्याकाळी ७:३० ते ८ या वेळेत भव्य पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

संध्याकाळी ८ वाजता सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांची संगीत मैफल या संपूर्ण सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहे. गडचिरोलीत प्रथमच अशा दर्जेदार कलाकाराचा कार्यक्रम होणार असल्याने हा क्षण ऐतिहासिक ठरणार आहे. या विशेष कार्यक्रमाला गडचिरोलीचे सहपालकमंत्री, आमदार, खासदार व इतर मान्यवर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकरन म्हणाले, हा सोहळा गडचिरोलीच्या चैतन्य आणि एकतेचे प्रतीक आहे. क्रीडा, मनोरंजन आणि संपूर्ण समाजाला एकत्र आणणारा हा उत्सव अनेक वर्षे लक्षात राहील. सोनू निगम यांच्या मैफिलीसह हा ग्रँड फिनाले निश्चितच संस्मरणीय ठरेल आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. जे प्रेक्षक वैयक्तिकरित्या उपस्थित राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम YouTube वर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.

या ऐतिहासिक सोळल्याला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे

error: Content is protected !!