– जागतिक महिलादिनी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपच्या जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस रेखाताई डोळस होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कविताताई पाचभाई, ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभाताई चौधरी, देवाळकर, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष अर्चना बोरकुटे उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा महामंत्री योगीताताई पिपरे म्हणाल्या, आज महिला सगळ्याच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. घरकामापासून ते लघु उद्योग, मोठे उद्योग, विविध कंपन्या व शासकीय, निमशासकीय कार्यालये व संस्थामध्ये महिला आज अग्रेसर होऊन कार्यरत आहेत ही महिलांसाठी अभिमानाची बाब आहे. यापुढेही जाऊन महिलांनी सर्वच क्षेत्रात नावलौकिक मिळविण्यासाठी परिश्रम घ्यावे, असे सांगितले. तसेच सुशिक्षित महिलांनी सामाजिक कार्यात सहभागी होऊन गरजू, गरीब व कामगार महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच आज महिला दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः आत्मनिर्भर होऊन विविध क्षेत्रात कार्यरत आहेत ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपच्या प्रदेश चिटणीस रेखाताई डोळस यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच अर्चना बोरकुटे, प्रतिभा चौधरी, कविता पाचभाई यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन पल्लवी बारापात्रे यांनी तर प्रास्ताविक कविता पाचभाई यांनी केले.







