Home गडचिरोली नागपूर येथे आदिवासी विकास राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा महासंग्राम

नागपूर येथे आदिवासी विकास राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा महासंग्राम

160

– शुक्रवारला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

– १ हजार ९१७ खेळाडू दाखविणार क्रीडा कौशल्य

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवार, ३ जानेवारीला सकाळी ११ वाजता पोलीस मुख्यालय, पोलीस लाईन टाकळी, नागपूर येथील मैदानावर होणार आहे. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या महासंग्रामात राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील १ हजार ९१७ आदिवासी खेळाडू आपल्या अंगी असलेले क्रीडा कौशल्य व नैपुण्य दाखविणार आहेत. या क्रीडा संमेलनाची भव्यता अनुभवायला मिळणार असून नवीन वर्षात क्रीडामय वातावरणात चित्तथरारक व चुरशीच्या सामन्याचा आनंद क्रीडाप्रेमींना लुटायला मिळणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके राहणार आहेत. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ, नियोजन, विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन,मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार कृपाल तुमाने, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार विकास ठाकरे, आमदार समीर मेघे, आमदार चरणसिंह ठाकूर, आमदार डॉ. आशिष देशमुख, आमदार संजय मेश्राम, जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी (भाप्रसे), पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल (भापोसे), नागपूर महानगर पालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी (भाप्रसे), जिल्हाधिकारी डॉ. विपीन (भाप्रसे), मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी (भाप्रसे) उपस्थित राहणार आहेत.

बक्षीस वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, ५ जानेवारीला दुपारी ४ वाजता होणार आहे. राज्यातील नागपूर, नाशिक, ठाणे व अमरावती या चार विभागातील खेळाडू ३ ते ५ जानेवारी या कालावधीत राज्यस्तरावर आपल्यातील क्रीडा गुण व प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले या सांघिक तसेच लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, धावणे आदी वैयक्तिक खेळात झुंजणार आहेत.

या निमित्ताने राज्यातील आश्रमशाळेतील खेळाडूंना राज्यस्तरावर क्रीडा क्षेत्रात आपले नावलौकिक करण्याची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. या क्रीडा संमेलनामध्ये आदिवासी संस्कृतीचे दर्शन होणार असून कलागुणांची उधळण देखील पाहायला मिळणार आहे.
या क्रीडा संमेलनात नागपूर विभागातील शासकीय आश्रम शाळांमध्ये राबविल्या जात असलेल्या ब्रायटर माईंड, मेमरी इन्हान्समेंट, बोलका वर्ग उपक्रम व मलखांब कौशल्याचे सादरीकरण केल्या जाणार आहे. राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असून आदिवासी विकास सचिव विजय वाघमारे (भाप्रसे), आयुक्त नयना गुंडे (भाप्रसे) यांच्या नियंत्रणात नागपूर विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी सुरू आहे. राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांची नियुक्ती झाली असून अधिकाऱ्यांसह कर्मचारी उत्साहाने कामाला लागलेले आहेत.

error: Content is protected !!