– अरविंदभाऊ कात्रटवार यांचे प्रतिपादन
– संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आंबेटोला येथील शेकडो माता भगिनींना ब्लॅंकेटचे वितरण
– शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिली गरजवंतांना मायेची ऊब
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : महाराष्ट्र ही संतांची पुण्यभूमी आहे. अशा या पुण्यभूमीत अनेक संत-महात्मे होऊन गेले. संत गाडगेबाबा हे त्यापैकी एक. समस्त मानवजातीची सेवाभावी वृत्तीने निरपेक्ष सेवा करून त्यांना अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी आणि परंपरा यांच्या जोखडातून बाहेर काढण्याचे महान कार्य त्यांनी केले. एक थोर समाजसेवक व क्रांतिकारक राष्ट्रीय संत, ज्यांनी प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन ‘स्वच्छते’चा महामंत्र संपूर्ण देशाला दिला. बाबांचे ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षणाविषयीची तळमळ आदी कार्य महाराष्ट्रासाठी व संपूर्ण देशासाठी दिपस्तंभासारखे दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसपंर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सेवाभावी उपक्रमातंर्गत संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील आंबेटोला येथे गरजवंतांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले, त्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आपला नित्य सेवाभाव कायम ठेवून थंडीच्या दिवसात गरजवंतांना ब्लॅंकेट वितरीत करून मायेची ऊब देत सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
अरविंदभाऊ कात्रटवार पुढे म्हणाले की, संत गाडगेबाबा यांनी संसाराचा त्याग करून आपले संपुर्ण जीवन समाजसेवेसाठी वाहून घेतले. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता ते कुणी अडचनीत सापडला असल्यास ते मदतीसाठी धावून जायचे. जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे, असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. यावरून संत गाडगेबाबा यांच्या कार्याची महती दिसून येते. संत गाडगेबाबा व शिवसेना प्रमुख हिंदु हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श जोपासूनच आपली सामाजिक वाटचाल सुरू आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही समाजातील प्रत्येक घटकांच्या कल्याणासाठी आणि समाजातील वंचीत घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबध्द आहे, असे अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले.
याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपतालुका प्रमुख यादवजी लोहंबरे, संजय बोबाटे, विकास उंदीरवाडे, देवेंद्र मुळे, दिलीप वलादे, गणेश ठाकूर, सुरेश कोलते, चुडाराम मूनघाटे, गोपाल मोगरकर, जीवन कुरूटकर, पवन पानसे, यादव चौधरी, कुमदेव आवारी, अजिंक्य नगराळे, कैलाश फुलझेले, विलास खोब्रागडे, रमेश आवारी, कुणाल आवारी, बाळू कोसमशीले, दिपक कोसमशीले, आदित्य खेडेकर, अमित चौधरी, प्रशांत पेंद्राम, खुशाल कारेते, गणेश गुंतीवार, युजीन चौधरी, पुरुषोत्तम सूर्यवंशी, चेतन लोणारे, संदेश सूर्यवंशी, दुशांत मंगर, प्रशांत पाल, विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, राकेश भैसारे यासह आदी शिवसैनिक व गावकरी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.







