– नवीन वेळापत्रकाचे आरोग्यावर दुष्परिणाम : आतातरी शासनाने लक्ष देण्याची संघटनेची मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून नव्या शालेय वेळापत्रकाप्रमाणे दोन सत्रात भरत आहेत. या वेळापत्रकाची अंमलबजावणी १० जुलै २०२३ पासून सुरू झाली असून नव्या वेळापत्रकाचे दुष्परिणाम विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर झाल्याचे दिसून येत आहे. बोचऱ्या थंडीत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना कुडकुडत उठावे लागते.
दुसऱ्या सत्रात काही विद्यार्थी सुस्तावलेले दिसतात. या वेळापत्रकाला आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेने विरोध केला आहे. विद्यार्थी व पालकांचाही विरोध आहे. काही लोकप्रतिनिधींचाही विरोध आहे. नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळीअधिवेशनाच्या निमित्ताने आता तरी शासन याकडे लक्ष देईल का? असा प्रश्न विद्यार्थी, पालक व कर्मचाऱ्यांना पडलेला आहे.
नव्या वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना पहाटे ५.३० वाजता उठावे लागते तर रात्री ९.३० वाजता झोपेची वेळ असते. सोमवार ते शुक्रवारला पहिले शालेय सत्र सकाळी ८.४५ वाजता सुरू होऊन दुपारी १२.३० वाजता संपते. जेवणानंतर दुसऱ्या सत्राला दुपारी १.३० वाजता सुरुवात होते व दुपारी ४.०० वाजता तासिका संपल्यानंतरही हा सत्र सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत असतो. सकाळचे जेवण दुपारी १२.३० वाजता तर रात्रीचे जेवण सायंकाळी ६.३० वाजता असते. सकाळी व सायंकाळी दोन वेळेस नाश्ता असतो. शनिवारला शालेय सत्रास सकाळी ७.४५ वाजता सुरुवात होऊन ११.५० ला सुट्टी होते. शनिवारला दुपारी ३.०० ते ४.३० पर्यंत प्रेरणादायी उद्बोधन असते.
आश्रमशाळेत विविध उपक्रम व अशा गैरसोयीचा वेळापत्रक याचा ताळमेळ बसविणे कठीण जात आहे. हा वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीला मारक ठरलेला आहे. सकाळ सत्रातील पाचव्या तासिकेला लहान विद्यार्थी भुकेने व्याकुळलेले असतात. या सर्व बाबी शासनाच्या लक्षात का येत नाही? जर लक्षात आल्याच असतील तर आश्रमशाळा पूर्ववत ११ ते ५ या वेळात भरविण्याचा आदेश का निघत नाही? असा प्रश्न सध्या पडलेला आहे.
संघटनेने या मागणीसाठी यापूर्वी दोनदा मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. त्याचप्रमाणे वेळोवेळी निवेदनही दिलेले आहे हे येथे उल्लेखनीय आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तरी यावर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी मागणी आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राज्य कार्याध्यक्ष एस. जे. शेवाळे, राज्य सरचिटणीस प्रा. बी. टी. भामरे, नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी, ठाणे विभागीय अध्यक्ष प्रा. प्रमोद पोगेरे, अमरावती विभागीय अध्यक्ष डॉ. अशोक झुंझारे, नाशिक विभागीय अध्यक्ष अमोल वाबळे यांनी केली आहे.







