Home गडचिरोली आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न करा

आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न करा

324

– प्रभारी प्रकल्पाधिकारी वहीद शेख यांचे आवाहन

– भविष्यवेधी शिक्षण प्रशिक्षण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी विकास विभाग अंतर्गत सुरू असलेल्या आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी मनापासून प्रयत्न करावे. भविष्यवेधी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नव्या जोमाने घडवावे, असे आवाहन गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रभारी प्रकल्प अधिकारी वहीद शेख यांनी केले.

आदिवासी विकास नागपूर अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीने येथील सेमाना बायपास रोडवरील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचे चार दिवसीय भविष्यवेधी शिक्षण प्रशिक्षण बुधवार, ११ डिसेंबर पासून सुरू झाले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

भविष्यवेधी शिक्षण उपक्रमाकडे आदिवासी विकास नागपूरचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांचे विशेष लक्ष आहे.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोली प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू आहे.

प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर, डॉ. प्रभू सादमवार, मुख्याध्यापिका वंदना महल्ले, प्रमोद वरगंटीवार, अजय आखाडे, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी रोशन पेंद्राम, संदीप फड, एल. के. नरोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

यापूर्वी झालेल्या भविष्यवेधी प्रशिक्षणाची उजळणी म्हणून सदर प्रशिक्षण आयोजित केले आहे. प्रशिक्षणात गडचिरोली प्रकल्पातील २४ शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक,प्राथमिक शिक्षक व कंत्राटी शिक्षक अशा एकूण सुमारे १४० शिक्षकांचा समावेश आहे. या प्रशिक्षणाआधी मुख्याध्यापकांसह ५० टक्के शिक्षकांचे प्रशिक्षण ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत पार पडले.आता उर्वरित ५० टक्के शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे.

प्रशिक्षणार्थी शिक्षकांना सुलभक म्हणून तुकाराम सोनकुसरे व योगेश वाढई मार्गदर्शन करीत आहेत.
जागतिक दर्जाचे स्वीकार्यता असणारे, भविष्यासाठी तयार असणारे विद्यार्थी विकसित करणे, १०० टक्के मुलांच्या १०० टक्के क्षमतांचा उपयोग करणे, २१ व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाणारे व कौशल्य अवगत असणारे विद्यार्थी तयार करणे हे या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे.

मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे, मुलांना शिकण्यास आव्हान देणे, विषयमित्र तयार करणे, मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे, एक तृतीयांश वेळात पाठ्यक्रम पूर्ण करणे, मुलांच्या शिक्षणात तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आदी किमान सहा पायऱ्या भविष्यवेधी शिक्षणात उपयोगात आणायच्या आहेत.

error: Content is protected !!