– गडचिरोली विधानसभा क्षेत्र ; व्हीलचेअर व वाहनाची केली व्यवस्था
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दिनांक २० नोव्हेंबर रोजी पार पडली असून लोकशाहीच्या उत्सवात ६८-गडचिरोली (अ.ज.) विधानसभा मतदारसंघात ३६२ मतदान केंद्रावर मतदान झाले. दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मागणी केल्याप्रमाणे व्हीलचेअर, वाहन व्यवस्था आदी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे गडचिरोली विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने मतदान केले.
भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार तसेच ८५ वर्षावरील जेष्ठ नागरिक मतदारांच्या सोयी सुविधांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या होत्या. यामध्ये दिव्यांग व जेष्ठ नागरिक यांना मतदान केंद्रावर सोय सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले होते. मतदानासाठी जनजागृती तसेच सर्व प्रकारच्या मतदारांसह दिव्यांग व ८५ वर्षावरील मतदारांना मदत करण्यासाठी आवश्यक त्या मतदान केंद्रावर समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मतदार दोस्ताल (मतदार साथी) व विद्यार्थिनीची मतदार सेल्लेख (मतदार भगिनी) म्हणून नियुक्ती केली होती. यासाठी गडचिरोली येथील फुले – आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात शिकणाऱ्या बीएसडब्ल्यू व एमएसडब्ल्यू मधील २४६ विद्यार्थ्यांची जिल्ह्यात निवड करण्यात आली.
जिल्ह्यात सर्व प्रकारच्या दिव्यांग मतदारांना मदत करण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या दिव्यांग मुलांच्या शाळांमधील १७६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दिव्यांग दुत ( दिव्यांग साथी) म्हणून नियुक्त करण्यात आली होती.मतदारांच्या निवासापासून तर मतदान केंद्रापर्यंत व मतदान केल्यानंतर सुरक्षित घरी पोहोचण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैनै व गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे दिव्यांग व ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी गडचिरोली विधानसभा मतदारसंघात लोकशाहीच्या उत्सवात उत्साहाने मतदान केले. दिव्यांग व जेष्ठ मतदारांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच मतदार जनजागृती उपक्रम यशस्वी व प्रभावीपणे राबवण्यासाठी समाज कल्याण विभाग गडचिरोलीचे सहाय्यक आयुक्त तथा सहाय्यक नोडल अधिकारी (स्वीप) डॉ. सचिन मडावी यांनी परिश्रम घेतले.