मानव अधिकार दिनानिमित्त नमाद महाविद्यालयात राज्यस्तरीय चर्चासत्र

114

– कोविड काळात मानव अधिकाराचे सर्वाधिक हनन : मान्यवरांचे प्रतिपादन

विदर्भ क्रांती न्यूज

गोंदिया (प्रतिनिधी) : गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय गोंदियाच्या आयक्यूएसी अंतर्गत पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाच्या वतीने मानव अधिकार दिनानिमित्त समकालीन परिप्रेक्ष्यातील मानवी हक्क या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय वेबिनारचे आभासी मंचावर आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळातील मानव अधिकार आणि दिव्यांगांचे मानव अधिकार या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन होत्या. यावेळी डॉ. राकेश खंडेलवाल, प्राध्यापक डॉ. अर्चना जैन, डॉ. एस. यु. खान, राज्यशास्त्र विभागाचे डॉ. एच. पी. पारधी, डॉ. किशोर वासनिक, डॉ. शशिकांत चौरे, प्रा. घनशाम गेडेकर उपस्थित होते. कोरोना काळातील मानव अधिकार या विषयावर मार्गदर्शन करताना नागपूर येथील अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रवीण भांगडीकर म्हणाले, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांच्या संघर्षात मानवी हक्कांची पायमल्ली झाली. त्यातून मानवी विकासासाठी मानव अधिकाराची संकल्पना पुढे आली. १० डिसेंबर १९४८ रोजी युनिवर्सल डिक्लेरेशन स्वीकारण्यात आले. याच काळात भारतात संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरु होती. संविधानकारांनी मानवी विकासाला प्राधान्य देत सविस्तर असे मुलभूत अधिकार भारतीय संविधानातून नागरिकांना उपलब्ध करून दिले आहे. गेल्या दीड वर्षांपासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोविड या महामारीने सारे जनजीवन त्रस्त करून सोडले आहे. आपल्या भारत या देशाचा जरी विचार केला तरी मानवी अधिकाराचे प्रचंड हनन झाल्याचे दिसून येईल. सविस्तर आकडेवारी देऊन डॉ. भांगडीकर यांनी आरोग्य, बेरोजगारी, घरगुती हिंसाचार आणि मजुरांचे स्थलांतर या प्रकारात नागरिकांच्या अधिकारांचे प्रचंड प्रमाणात हनन झाले हे पटवून दिले. शासनाने आरोग्य, बेरोजगारी, घरगुती हिंसाचार आणि मजुरांचे स्थलांतर या विषयाबद्दल आकडे जाहीर केले नाहीत तर स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून या गंभीर बाबी पुढे आल्या. शासन, प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांच्यााकडे बोट न दाखविता आपण सर्वांंनी मानव अधिकाराच्या संरक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. भांगडीकर यांनी केले.
दुसऱ्या सत्रात दिव्यांगांचे मानव अधिकार या विषयावर जिल्हा परिषद गोंदियाच्या सर्वशिक्षा अभियानाचे जिल्हा समन्वयक विनोद ठोकणे यांनी दिव्यांगांच्या २१ प्रकारची माहिती दिली. निसर्ग, साधारण माणूस आणि दिव्यांग यात फरक करीत नाहीत, असे सांगत दिव्यांग बंधूंना माणुसकीची वागणूक देण्याचे आवाहन केले. दिव्यांग सुद्धा आपलेच बांधव आहेत. त्यांना दया, भीक न देता त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ठोकणे यांनी केले.
यावेळी प्राचार्या डॉ. शारदा महाजन. डॉ. राकेश खंडेलवाल. डॉ. एस. यु. खान यांचे समयोचित भाषण तर बीजभाषण डॉ. अर्चना जैन यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. घनशाम गेडेकर, प्रास्ताविक कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. शशिकांत चौरे तर आभार डॉ. एच. पी. पारधी व डॉ. किशोर वासनिक यांनी मानले. वेबिनारसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून बहुसंख्य विद्यार्थी आणि शिक्षक झूम आणि फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून सहभागी झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापकवृंद आणि प्रा. नरेश भुरे यांनी सहकार्य केले.