आलापल्ली – गुडीगुड्डम महामार्गाच्या कामात मातीचा वापर

18

– दोषींवर कारवाई न झाल्यास ताटीकोंडावार यांचा उपोषणाचा इशारा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आलापल्ली – सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील आलापल्ली ते गुडीगुड्डम या मुख्य रस्त्याच्या कामात मुरुमाऐवजी मातीचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सदर कामाच्या गुणवत्तेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यात शासकीय निधीची उधळपट्टी होत असताना मात्र संबंधित अधिकार्रयांचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या महामार्गावर कंत्राटदाराने शासनासोबत केलेल्या ईपीसी मोडच्या करारनाम्यानुसार काम न करता आपल्या मर्जीने करत असल्याचे दिसून येत आहे. ५०० मि. मी. खोदकाम करून ३०० मि. मी. मुरुम टाकणे आवश्यक असताना एकही सबग्रेड मुरूम न वापरता मातीवर केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी या मार्गाचा आठ वर्षानंतर होत असलेल्या कामाची ही स्थिती असल्याने शासकीय निधी पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे.

आलापल्ली ते गुडीगुड्डम महामार्गावर मुरुमाऐवजी मातीचा वापर करण्यात येत आहे. या कामावर संबंधित विभागाचे अधिकारी भेट देत नाहीत. आलापल्ली -सिरोंचा या मार्गावरून आलापल्ली ते गुडीगुड्डमला जोडणारा १६ किमीचा रस्ता एकूण ५७ कोटी रुपये इतका आहे. हा राष्ट्रीय महामार्ग आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच होत आहे. यामुळे या निधीतून दर्जेदार काम होणे गरजेचे आहे. मुरुमाऐवजी मातीचा वापर होत असल्याने हा रस्ता किती दिवस टिकेल, असा प्रश्न निर्माण होत आहे.

चौकशी होऊन कारवाई न झाल्यास उपोषण

सदर कामाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे. या कामाची चौकशी करून कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे.