मुनघाटे महाविद्यालयातर्फे अंधांसाठी आर्थिक मदत

14

– व्हाईट केन दिवस साजरा : गोळा केला निधी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोलीद्वारा संचालित कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयात व्हाईट केन दिवस प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.

इंडियन असोसिएशन फॉर द ब्लाइंड (आय. ए. बी.) ही संस्था अंधांसाठी कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेमार्फत देशातील अंध विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार, नोकरी व पुनर्वसन मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मागील सात -आठ वर्षांपासून महाविद्यालयात निधी संकलनाचा कार्यक्रम नियमित पार पाडून अंधांसाठी कार्य करणाऱ्या या संस्थेला मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा खारीचा वाटा महाविद्यालय उचलत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी मिळून ३ हजार ५०० रुपये निधी गोळा केला. नुकताच तो निधी आय. ए. बी. ट्रस्ट या नावाने डिमांड ड्राफ्ट काढून पाठविण्यात आला.

महाविद्यालयाला दरवर्षी आय. ए. बी. या संस्थेमार्फत प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येते. या कार्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी. एस. खोपे, लोकसंख्या शिक्षण मंडळ विभागाचे प्रमुख डॉ. गणेश सातपुते, सहायक प्राध्यापक डॉ. रविंद्र विखार व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. महाविद्यालयाच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजातील विविध घटकांच्या समस्या जवळून अनुभवता येतात.