चातगाव येथे व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनावर जनजागृती कार्यक्रम

28
Oplus_0

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव येथे शारदा उत्सव महिला मंडळाच्या सहकार्याने तथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गोपाल उईके तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू जिवानी, ग्रामपंचायत सदस्य राजू ठाकरे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून विलास निंबोरकर, विठ्ठल कोठारे, हरिदास कोटरंगे, प्रा. वासुदेव तडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

Oplus_0

सुरुवातीला हरिदास कोटरंगे यांनी व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित चळवळीचे गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. त्यानंतर विद्यार्थिनी सानिया व समीक्षा यांनी गीतगायन केले. सद्या तरुण व नागरिक व्यसनाधीन होत चालले आहेत. वाईट व्यसनामुळे कामाकडे व संसाराकडे त्यांचे दुर्लक्ष होत असून व्यसनाधिनतेमुळे अनेकांचे संसार मोडले सुद्धा आहेत. त्यामुळे तरुण व नागरिकांनी वाईट व्यसनेकडे दुर्लक्ष करून चांगल्या समाजकार्याकडे आपले लक्ष्य वेधले पाहिजे, असे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले. तसेच सध्या काही लोकांना अंधश्रद्धेने पछाडले असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे. अशिक्षितपण व अज्ञानामुळे काही नागरिक आरोग्यासाठी रुग्णालयातून ओषधोपचार न करता बुवाबाजीकडे धाव घेतात व आपला जीव गमावून बसतात. त्यामुळे आताच सावधगिरी बाळगून अंधश्रद्धेचा मार्ग सोडून चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरित व्हावे याकरिता व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शारदा उत्सव महिला मंडळाचे सदस्य व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला चातगाव व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.