प्रत्येकांनी धम्म आचरणाचा दृढसंकल्य करावा : धर्मानंद मेश्राम

93

– इंदिरानगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम साजरा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या परिश्रमाने व कष्टाने आपल्याला हे वैभव प्राप्त करून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमुळे आपल्या जीवनात आमुलाग्र बदल झाला. आमची गुलामी जाऊन आम्हाला स्वातंत्य, समता, न्याय व बंधुताची शिकवण देणारा बुद्धधम्म मिळाला. आपला व येणाऱ्या पिढीचा विकास करायचा असेल तर तथागतांच्या धम्माचे आचरण केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून प्रत्येकांनी धम्म आचरणाचा दृढसंकल्य करावा, असे आवाहन धर्मानंद मेश्राम यांनी केले.

गडचिरोली शहरातील इंदिरानगर वार्डात शनिवार, १२ ऑक्टोबर २०२४ रोजी तथागत बौद्ध समाज मंडळ इंदिरानगरतर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून धर्मानंद मेश्राम होते तर प्रमुख अतिथी म्हणून देवानंद उराडे, मनोज डोंगरे, सतीश भानारकर, आशिष घोनमोडे, अनमोल मेश्राम, भाग्यश्री नंदेश्वर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व मेणबती प्रज्वलीत करून झाली. त्यानंतर ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली व सामुहिक बुध्दवंदना उपस्थितांनी ग्रहण केली.

धर्मानंद मेश्राम पुढे बोलताना म्हणाले की, तथागताचा धम्म हा फक्त पुस्तके वाचून पठनाचा नसून त्याचे आचरण करणे हाच उद्धाराचा मार्ग आहे. आपण स्वतः धम्म जीवन जगत असताना आपल्या आजुबाजुला असलेल्या शेजारी लोकांना सुद्धा धम्माची माहिती द्यावी. कारण तथागताचा धम्म हा सर्वांच्या कल्याणाचा मार्ग आहे.

यावेळी अनमोल मेश्राम, भाग्यश्री नंदेश्वर, आशिष घोनमोडे, सम्बोधी खोब्रागडे, राजरत्न पेटकर यांनी धम्मावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन सचिन पाटील यांनी केले. यावेळी इंदिरानगर येथील जनता मोठ्या संख्येने उपास्थित होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तथागत बौद्ध समाज मंडळ इंदिरानगरच्या सदस्यांनी सहकार्य केले.